व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गुजरातमधील ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून गुजरात येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय, या पैशाचे धनी कोण? त्यातील कोण कोण जेलात जाणार? हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग माफियांनी गुजरातमार्गे हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे. मागील सहा महिन्यांत गुजरातच्या किनारपट्टीवर 30 हजार किलोचे ड्रग्ज पकडण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 5 हजार कोटी आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवून नेताच महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना व संताप व्यक्त झाला. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यावर सांगितले, “गुजरातमध्ये फॉक्सकॉन गेला म्हणून काय बिघडले? गुजरात पाकिस्तानमध्ये आहे काय?” श्रीमान फडणवीस, तुमचा मुद्दा योग्य आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये नाही, पण गुजरातमध्ये पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानशी संबंधित ‘ड्रग्ज माफिया टोळीचे कनेक्शन उघड झाले आहे असं शिवसेनेने म्हंटल.

मुंद्रा बंदरातून जून महिन्यात 500 किलोंचे कोकेन जप्त झाले. पाठोपाठ जखाऊ बंदराजवळ 250 कोटींची हेरॉईन तस्करी उजेडात आली. याच काळात पाकिस्तानी बोटींतून 50 किलोचा हेरॉईनचा साठा गुजरातला आणला जात होता. 50 किलो हिरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 250 कोटी रुपये आहे. मुंद्रा बंदरातून जे 500 कोटींचे कोकेन जप्त केले ते इराणमधून आले. मिठाच्या पिशव्या असल्याचे सांगून ते आणले गेले. ते पकडले गेले असले तरी अशा शेकडो कोटींच्या ‘मिठाच्या पिशव्या’ गुजरातमार्गे देशात गेल्या असतील. गुजरातमधील याच बंदरावरून 15 सप्टेंबर 2021 रोजी तीन हजार किलोचे ‘ड्रग्ज’ पकडले गेले तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. याच मुद्रा पोर्टवरील कारवाईत दोन दिवसांपूर्वी 50 कोटी रुपयांची ‘ई-सिगारेट’ नामक नशिली खेप जप्त केली. चीनमधून आलेल्या दोन संशयास्पद कंटेनरमधून ई सिगारेटची 2 लाख 400 पाकिटे मुंद्रा बंदरात पोहोचली. हिंदुस्थानात ‘ई-सिगारेटवर बंदी आहे. म्हणजे आता पाकिस्तानबरोबर चीनही गुजरातच्या भूमीवर नशेचा धूर सोडत आहे. असं म्हणत सामनातून संपूर्ण ड्रग तस्करीबाबत माहितीच सादर केली.

पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी व भूमी इतकी सुरक्षित का वाटत आहे? त्यांच्या पाठीशी कोणती महाशक्ती आहे? तस्करीचा पैसा नक्की कोठे वळवला जात आहे? महाराष्ट्रातील पन्नास आमदारांना गुजरातमध्ये आश्रय दिला हे तर जगजाहीर आहेच. शिवाय त्यांना प्रत्येकी 50 खोकी दिली हे आरोपही सर्रास होतच आहेत. हे हजारो कोटी याच ड्रग्ज तस्करीचा भाग आहेत काय? असे अनेक राष्ट्रहिताचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत.

गुजरात हे ‘ड्रग्जांचे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनले असेल तर महाराष्ट्राला चिंता वाटावी अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. मुंबई महाराष्ट्रातील 10 टक्के कमिशनखोरीवर स्वताचा बुलबुल वाजविणारयांनी गुजरातमधील ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय, महाराष्ट्रातील शिवसेना फोडण्यासाठी व सध्याचे सरकार बनविण्यासाठी हा पैसा कसा कामी आला यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण? त्यातील कोण कोण जेलात जाणार? हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे अशी टीका शिवसेनेने केली.