हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी दिलीपकुमार यांनी आपला अखेरचा श्वास घेतल्यानंतर संपूर्ण देशावर आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. दरम्यान शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन दिलीपकुमार यांच्या एकूण जीवनप्रवासाबद्दल भरभरून लिहीत त्यांना आदरांजली वाहिली आहे.दिलीपकुमार हे केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेते नव्हते तर अभिनयाची चालती बोलती संस्था होती अस शिवसेनेने म्हंटल.
जागतिक कीर्तीचे महान कलावंत दिलीप कुमार अर्थात युसूफ खान यांचे निधन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एका प्रदीर्घ कालखंडाची अखेर आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यासाठी देशाच्या चित्रपटसृष्टीचा श्वासही काही काळ थांबला असेल. वयाच्या विशीत युसूफ खान या नावाचा एक तरुण चित्रपटसृष्टीत येतो आणि सरिता स्वतःचा मार्ग स्वत बनविते त्याप्रमाणे प्रखर आत्मविश्वास, कलेवरील अढळ निष्ठा आणि प्रत्यक्ष काम चोखपणे पूर्णत्वाला नेण्याची जिद्द याची कास धरून आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. दिलीप कुमार हा चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच म्हणायला हवा. शंभरीपर्यंत पोहोचतानाच त्यांचे झालेले निधन म्हणजे परिपूर्ण जीवनाची समाप्ती आहे असे शिवसेनेने म्हंटल.
दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरू-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे. राजबिंडे रूप, जबरदस्त संवादफेक, अनेकदा सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा ‘अँग्री यंग मॅन’, तितकाच भावुक, प्रेमळ, त्यातून निर्माण झालेला ‘टॅजेडी किंग’ अशा विविध रूपांत दिलीप कुमारने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पडदा व्यापला. “मैने हमेशा अपने जूतों का साइज अपने पावसे बड़ा रखा है” असा डायलॉग फेकत चित्रपटांतून विजेचा करंट सोडणारा दिलीप कुमार म्हणजे हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा मोहराच होता. हा ‘मोहरा’ आपल्यातून निघून गेला, हे मानायलाच मन तयार होत नाही.
पाकिस्तानातल्या पठाण कुटुंबातील फळविक्रेत्याचा मुलगा असलेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान पठाण या राकट अक्षराशी जराही साम्य नसलेला शांत व एकांतप्रिय युसूफ खान मुंबईत येतो, लहानाचा मोठा होतो, शिकतो, पुण्यामध्ये लष्कराच्या छावणीत कॅण्टीन चालवितो, तिथे बॉम्बे टॉकीजच्या देविका रानींची या तरुणावर नजर पडते, युसूफ खान हे नाव रोमॅटिक हिरोला ‘सूट’ होणार नाही म्हणून त्याचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले जाते आणि तोच दिलीप कुमार फिल्म इंडस्ट्रीचा पहिला सुपरस्टार बनण्याचा इतिहास घडवितो. हा सगळाच प्रवास विस्मयकारक आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अभिनयाचे सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार आजही दिलीप कुमार यांच्याच नावावर आहेत. काही काळ ते राज्यसभेचे सदस्यही होते. मूळ पाकिस्तानचे असलेल्या दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारनेही ‘निशान-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च नागरी किताब दिला होता. पाकिस्तानचा हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी दिलीप कुमार यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेनाप्रमुखांच्या मैत्रीत त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही. दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशहा होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार, तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच. ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत! असे म्हणत शिवसेनेने दिलीपकुमार यांना आदरांजली वाहिली.