हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक – पुणे महामार्गावर चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज पहाटे घडली. बसने भररस्त्यात अचानक पेट घेताच सर्व प्रवाशी त्वरित गाडीबाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस क्रमांक (MH 06 BW 0640) ही बस नाशिकहून पुण्याला जात होती. बस सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात आली असता तिच्यातून अचानक धूर येऊ लागला असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आल्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला.
राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित बसला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.