हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षाच्या तरुणीला जमिनीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावातील काही लोकांनी या 22 वर्षे मुलीसोबत हे नृशंस कृत्य केले आहे. या घटनेवेळी जमावासोबत पोलीसही घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार कोंढवळे गावात घडला आहे. न्यायप्रविष्ट जमीनीचा ताबा घेण्यासाठी काही लोक पोलिसांसह संबंधित कुटुंबाकडे आले होते. यावेळी या जमावाला रोखण्याचा बावीस वर्षीय तरुणीने प्रयत्न केला. मात्र जमावाने जेसीबीच्या मदतीने तिच्या अंगावर माती टाकली. यानंतर तिला जमीनीत गाठण्याचा प्रयत्न केला गेला. याचवेळी कुटुंबाला तिचा आवाज ऐकू आला ज्यामुळे त्यांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. यानंतर बरेच प्रयत्न करून त्यांनी मुलीला बाहेर काढले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संबंधित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी कमरेपर्यंत मातीत गाडली गेल्याची दिसत आहे. यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंब प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व घटनेप्रकरणी संबंधित मुलीच्या बहिणीने सांगितले आहे की, आम्ही शेतात काम करत असताना तेथे दहा ते बारा गुंडा आले होते. त्यांनी शेतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला आम्ही तीव्र विरोध दर्शवला. मात्र त्यांनी आम्हाला बाजूला सारले. तसेच बहिणीच्या संपूर्ण अंगावर माती टाकून दिली. ज्यामुळे ती मातीच्या ढिगार्याखाली दबली गेली. ही गोष्ट लक्षात येतात आम्ही तिच्या मदतीसाठी धावलो आणि तिला त्यातून बाहेर काढले.