हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असतो. चांगल्यात चांगल्या पगाराची नोकरी (Job) शोधून आपल्या जीवनात स्थिर होण्याचा आपला प्रयत्न असतो. परंतु वर्कइंडियाच्या एका रिपोर्टनुसार, देशातील खासगी क्षेत्रात नोकरी (job) करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. बहुतेक लोकांचे पगार दरमहा 20,000 रुपये किंवा त्याहून कमी आहेत असं या अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे देशातील तरुणाईसाठी हि चिंतेची बाब म्हणावी लागेल.
57.63 टक्क्यांहून अधिक कामगार-केंद्रित नोकऱ्या दरमहा 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या श्रेणीत येतात, असे वर्कइंडिया या तंत्रज्ञानावर आधारित कामगार-केंद्रित भर्ती मंचाने अहवालात म्हटले आहे. यावरून असे दिसून येते की अनेक कामगार किमान वेतनाच्या जवळपास कमावतात. अहवालात असे दिसून आले आहे की सुमारे 29.34 टक्के कामगार-केंद्रित नोकऱ्या मध्यम उत्पन्न गटातील आहेत, ज्यांचे वेतन 20,000- 40,000 रुपये प्रति महिना आहे.अहवालानुसार, या श्रेणीतील उत्पन्न सदर व्यक्तींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करते परंतु बचत किंवा गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे शिल्लक राहत नाहीत तसेच असे लोक आरामदायी जीवनमान जगू शकत नाहीत असेही या रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.
वर्कइंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक नीलेश डुंगरवाल यांनी याबाबत सांगितले की, सदर रिपोर्ट मधून हे लक्षात येत कि, कमी वेतनाच्या नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाटा कामगार क्षेत्राचा आहे. तसेच यामध्ये जास्त पगार मिळण्याच्या संधीही खूपच मर्यादित आहेत. ही असमानता केवळ कर्मचाऱ्यांच्या मोठ्या भागासमोरील आर्थिक आव्हानेच प्रतिबिंबित करत नाही, तर सामाजिक स्थिरता आणि आर्थिक वाढीवरही व्यापक परिणाम करते. त्यासाठी कौशल्य विकास, वेतन सुधारणा आणि उच्च वेतनाच्या संधी निर्माण कराव्या लागतील.