नागपूर हिंसाचार प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Nagpur violence case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूरमध्ये (Nagpur) सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण राज्य हादरले आहे. येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादामध्ये प्रचंड दगडफेक झाली, अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसेच काही वाहनांना आग लावण्यात आली. परिस्थिती हाताळण्यास गेलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांवरही जमावाने हल्ला केला, ज्यामध्ये काहीजण जखमी झाले.

या घटनेनंतर नागपूरमधील काही भागांमध्ये अजूनही संचारबंदी लागू आहे. महत्वाचे म्हणजे, पोलिसांनी या हिंसाचाराच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. नागपूर पोलिसांकडून फहीम खान (Faheem Khan) या व्यक्तीवर या संपूर्ण कटाचे नेतृत्व केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी फहीम खानसह 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत काही परदेशी शक्तींचा हात असल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या हिंसाचारामागे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी तपासादरम्यान तब्बल 172 व्हिडिओ हाती लावले आहेत. जे नागपूरच्या वातावरणात तणाव निर्माण करण्यासाठी वापरण्यात आले होते. हे व्हिडिओ बांग्लादेश आणि इतर परदेशी IP अ‍ॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आले होते. पोलिस आता या व्हिडिओंच्या मूळ स्त्रोताचा शोध घेत आहेत आणि संबंधित मोबाईल नंबरांचीही चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खानच्या हालचालींचा मागोवा घेत असताना, त्याच्या मालेगाव दौऱ्याची माहिती समोर आली आहे. पाच महिन्यांपूर्वी तो मालेगावात गेला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याने मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) च्या वतीने पक्षाच्या कार्याचे नियोजन मालेगावमध्ये केले होते. त्याच पक्षाच्या मोहम्मद फरान शकील अहमद यांनी मालेगाव मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

कोण आहे फहीम खान?

फहीम खान हा नागपूरमधील मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या 38 वर्षीय फहीम खानने यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्याला केवळ 1,073 मते मिळाली होती. पोलिसांच्या चौकशीनुसार, नागपूरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात जमाव गोळा केला आणि वातावरण तापवण्याचे काम केले.

दरम्यान, सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तसेच हिंसाचाराच्या कटात कोणाकोणाचा सहभाग होता, हे शोधून काढण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. याबरोबर, परदेशी गुप्तहेर यंत्रणांचा यात सहभाग असल्याच्या शक्यतेचीही चौकशी सुरू आहे. नागपूरमधील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह, नागपूरकरांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.