औरंगाबाद | एमडी मेडिसीन असलेल्या डॉक्टर महिलेला बळजबरीने विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी खडकेश्वर येथे घडली. या महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनिषा चंद्रकांत तमेवार (३४) असे डॉक्टर महिलेचे नाव आहे.
महिलेने दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी पती डॉ. चंद्रकांत तमेवार (रा. कल्याणी वैभव अपार्टमेंट, खडकेश्वर मंदिराजवळ, औरंगाबाद), सासरे रामराव तमेवार, दिर अविनाश, तसेच सासू व नणंद अशा पाच जणांच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मनिषा यांचा विवाह २०१४ मध्ये डॉ. चंद्रकांत यांच्याबरोबर झाला होता. डॉ. चंद्रकांत हे शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर सुरवातीचे तीन ते चार महिने चांगले गेले. दरम्यान, डॉ. मनिषा यांचा वसमत (जि.हिंगोली) येथे स्वतःचा दवाखाना असल्याने त्यांचे जाणे-येणे सुरु होते. काही दिवसानंतर मात्र पती व कुटूंबीयांनी छळ सुरु केला. तसेच मारहाणही केली.
दरम्यानच्या काळात डॉ. चंद्रकांत यांचा पूर्वीच म्हणजे २०११ मध्ये दुसऱ्या महिलेशी विवाह झालेला आहे. त्यांचा घटस्फोटही झाला असून, त्यांच्यावर पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हेही दाखल असल्याचे डॉ. मनिषा यांना समजले. त्रास कमी होत नसल्याने डॉ. मनिषा या सध्या वडीलांकडे वसमत येथे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. चंद्रकांत यांनी वसमत येथे येऊन घरातून दागिने चोरले मारहाणही केली होती. मात्र चार दिवसांपूर्वी डॉ. चंद्रकांतने पत्नी डॉ. मनिषा यांच्या भावाला सांगून पुन्हा तडजोड करण्याचे सांगत बोलावून घेतले. त्यामुळे डॉ. मनिषा व त्यांचा भाऊ बालाजी असे दोघे जण शुक्रवारी (ता. २७) खडकेश्वर येथे आले. बहिणीला सोडल्यानंतर भाऊ बाहेर गेला होता. त्याचवेळी सासरे, सासू, ननंद, दिर यांनी भांडण सुरु केले. त्यानंतर सासूने व नणंद हिने पकडून ठेवले त्यानंतर दिराने विषाची बाटला काढून बळजबरीने तोंडात ओतले. हा सर्व प्रकार पतीच्या सांगण्यावरुन केला, असा जबाब डॉ. मनिषा यांनी दिला आहे.