हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) गेल्या काही दिवसांपासून एकापेक्षा एक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच बंगळुरुत अॅमेझॉन कंपनीने डिलिव्हरी केलेल्या पार्सल बॉक्समध्ये जिवंत साप आढळल्याची गंभीर घटना घडली होती. तर एका ठिकाणी हर्षी चॉकलेटमध्ये मेलेला उंदीर सापडला होता. इतकेच नव्हे तर अलीकडेच आईस्क्रीममध्ये माणसाचे बोट आढळल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला होता. या घटना अत्यंत ताज्या असतानाच आता गुजरातमधील एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध फूड सेंटरमध्ये सांबाराच्या वाटीत मृत उंदीर आढळल्याचे हे वृत्त आहे.
गुजरातमधील प्रसिद्ध फूड सेंटरमध्ये घडला प्रकार (Shocking Video)
गुजरातच्या अहमदाबाद येथील देवी डोसा सेंटर हे अत्यंत प्रसिद्ध फूड सेंटर आहे. या ठिकाणी बरेच खवय्ये मोठ्या आवडीने वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. दरम्यान, या ठिकाणी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. देवी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाला सांबाराच्या वाटीत मृत उंदीर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खरंतर हे ठिकाण दाक्षिणात्य पदार्थांसाठी एक सर्वोत्तम स्पॉट मानले जाते. मात्र या घटनेनंतर इथे कुणी खवय्या फिरकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अहमदाबादच्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाने डोसा आणि ईडली मागवली होती. त्यासोबत वाटीत सांबार आले होते. त्या सांबारच्या वाटीत ग्राहकाला मृत उंदीर आढळला आणि यानंतर त्या ग्राहकाने अहमदाबाद महापालिकेत धाव घेतली. या संदर्भात त्याने अन्न आणि औषध प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.
आरोग्य विभागाची तडक कारवाई
ग्राहकाच्या तक्रारीची नोंद घेऊन आरोग्य विभागाने अहमदाबादच्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन स्वतः पाहणी केली. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, डोसा सेंटरमध्ये सांबार आणि चटणी यांसारखे पदार्थ चक्क उघड्यावर ठेवले आहेत. (Shocking Video) जिथे ग्राहकांना पदार्थ सर्व्ह केले जातात त्या ठिकाणी पदार्थ उघडे ठेवल्याने यात उंदीर पडला असेल, अशी लोकांकडून शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ अहमदाबाद अपडेट्स नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ज्या ग्राहकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला त्याने स्वतः या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सांबारात पडलेल्या या उंदराचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यावर बऱ्याच युजर्सच्या विविध प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. (Shocking Video) यावर संताप व्यक्त करताना एका युजरने म्हटले आहे की, ‘टेबलाखालून पैसे घेऊन असल्या हॉटेल्सना संमती देऊ नका’, तर आणखी एकाने लिहिलं, ‘बंद करा हे हॉटेल.. लोकांच्या जिवाशी खेळ चालवला आहे’. तर आणखी एकाने म्हटले, ‘खाण्याचा दर्जा दिवसेंदिवस बिघडत चालला आहे… यावर काहीतरी लवकर ऍक्शन घ्या’.