औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील टाकळी येथे कोलते येथे विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी तब्बल सात तास शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यातील काही मागण्या वकरच मंजूर करण्यात येतील असे आश्वासन तहसील प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, टाकळी कोलते येथे 69 लाभार्थ्यांचे शौचालयाचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, जलकुंभांची दुरावस्था झाली असून ते पाडून नव्याने बांधून शुद्ध पाणीपुरवठा करावा, मंजूर झालेले तीन सिंगल फेज ट्रांसफार्मर कार्यान्वित करून तात्काळ वीज पुरवठा करण्यात यावा, मोकळे करून मजबुतीकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते राहुल काकडे, कल्याण काकडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही. असा आक्रमक पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते. कार्यकर्त्यांनी सोबत पेट्रोल भरून कॅन नेली होती. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद पवार यांच्यासह पंचायत समिती तहसीलचे कर्मचारी यांनी या घटनास्थळी धाव घेतली.