सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आणि भंडारा खोबऱ्याच्या अक्षतासह सुमारे सहा लाखाहून अधिक भाविकांच्या साक्षीने सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात पार पडला. दरम्यान दोन वर्षानंतर श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला होता.
गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द झाली होती. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त यात्रा असल्याने यात्रेस भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. तर यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्या परराज्यातून आलेले खंडोबाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाची गाडे, पालखी यासह मानकरी यांना रथातून घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
येळकोट येळकोट जय मल्हार…; लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळा संपन्न #Hellomaharashtra pic.twitter.com/nqNpGf27uK
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 5, 2023
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवास पोटास बांधून अंधार दरवाजा जवळ आले. या ठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या छत्र्या, चोपदारांचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाची गाडे व त्या पाठोपाठ श्री खंडोबा व म्हाळसा यांची रथातून निघालेली भव्यदिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष केला.
मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या मुख्य चौकात सर्व बाजूने ब्यारिगेट लावल्याने मिरवणुकी वेळी भाविकांचे होणारी गर्दी आटोक्यात आणण्यास पोलीस प्रशासनाला यश आले, तर तारळी नदीपात्रातील दक्षिण पात्र भंडारा खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पालनगरी पिवळी दमक झाली होती. मिरवणूक तारळी नदीपात्रात येताच लाखो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करीत खंडोबा म्हाळसा यांचा जय जयकार केला. मुख्य मिरवणूक तारळी नदीपत्रातून मारुती मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडोबाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाला.
जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसरातील मुख्य चौक यावर्षी पूर्णता रिकामा ठेवला होता तर काशिळ पाल मार्गावरून येणारे भाविक थेट वाळवंटात जात होते. काही भाविक मंदिर परिसरात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीसाठी थांबले होते तर हरपळवाडी या मार्गावरून व मंदिरातून येणारे भाविक हे नदीच्या उत्तर वाळवंटात साकव पुलावरून सोडले जात होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी यांनी भाविकांचे आभार मानले आहेत. तसेच यात्रेस आलेल्या भाविकांना विनासायास खंडोबाचे दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या शिस्तबद्ध दर्शनबारीचे भाविकांकडून स्वागत होत होते.