माऊलीच्या पालखी सोहळ्यावेळी कोणतीही गैरसोय नको; बांधकाममंत्री चव्हाणांचे प्रशासनाला आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि. 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यात असून फलटण मुक्कामी असणार आहे. या पालखीच्या मुक्कामी काळात पालखी सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होता कामा नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी फलटण येथील पालखी तळास नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर याची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी पालखी काहीकाळ विसावते. कारण या ठिकाणी पालखी तळ प्रशस्त आहे. या ठिकाणी मानाच्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी बसतात. यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान भाविक तसेच वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. त्याचसोबत नोंदणी नसलेल्या दिंड्यांचीही विशेष व्यवस्था करावी

यावेळी प्रांताधिकारी डॉ. जगताप म्हणाले, जिल्ह्यातील इतर पालखी तळांच्या तुलनेमध्ये फलटणचा पालखी तळ भव्यदिव्य आहे. या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या सर्व बाबींचे योग्यरीत्या नियोजन केले जाते. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून फलटण पालखी तळावर कोणतीही कमतरता भासू देणार नाही.