IND Vs NZ : शुभमन गिलची डबल सेंचुरी; भारताचा धावांचा डोंगर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने तडाखेबंद द्विशतक झळकावले आहे. गिलने अवघ्या 149 चेंडूत 208 धावांचा रतीब घातला. एकदिवसीय कारकिर्दीतील अवघ्या 19 व्या सामन्यातच गिलने डबल सेंचुरी मारत नवा विक्रम सुद्धा केला आहे. गिलच्या या वादळी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकात 8 गडी गमावून 349 धावांचा डोंगर उभा केला.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. सुरुवाती पासूनच भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंड गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्यातही शुभमन गिलने सुरुवातीपासून चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंड गोलंदाजांची पिसे काढली. गिलने 149 चेंडूत 208 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार मारले.

गिल व्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नसली रोहित, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव उपयुक्त खेळी करत गिलला साथ दिली. रोहितने 34, सूर्यकुमारने 31 तर हार्दिक पंड्याने 28 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंड कडून हेन्री शिल्पे आणि डार्लि मिचेल यांनी प्रत्येकी 2 तर फर्ग्युसन, टिकनर आणि मिचेल संटनरने प्रत्येकी 1 बळी घेतला.