शिंदे गटाचे ढाल- तलवार चिन्ह वादात; कोणी घेतलाय आक्षेप?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र आता हे चिन्हच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याच कारण म्हणजे शीख समाजातर्फे या चिन्हांबाबत आक्षेप घेण्यात आला असून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे.

ढाल तलवार हे चिन्ह खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी मिळतं जुळतं असल्याने त्याचा निवडणूकी चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी कामठेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं असून जर याबाबत निर्णय झाला नाही तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाची अडचण होऊ शकते. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर सुद्धा समता पक्षानं दावा केला आहे.

दरम्यान, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशा ३ चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यातील ढाल तलवार हे चिन्ह आयोगाकडून त्यांना देण्यात आलं. तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी ३ नावे दिली होती त्यातील बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळाल आहे.