डॉ श्रीराम लागू विशेष | डॉ मनिषा पाटील
झोपायच्या तयारीत असताना एकदा व्हाट्सएपच्या मेसेजेस वर नजर टाकावी म्हणून मोबाईल हातात घेतला आणि कुटुंबाच्या ग्रुपवर विनम्र श्रद्धांजली असा दादाचा मेसेज दिसला . कोण असावं असा विचार करत असताना हॅलो महाराष्ट्र ची लिंक दिसली आणि एक क्षणभर दिसेना झाले कारण डोळ्यातल्या पाण्यानी समोरची अक्षरे दिसेनाशी झालेली. “नटसम्राट काळाच्या पडद्याआड” शब्द दिसत होते पण मन आणि मेंदूला अर्थ कळायला वेळ लागत होता. पिंजरा मधले मास्तर ते नटसम्राट मधले अप्पा बेलवनकर अशा विविध बहुरंगी भूमिका करणारे श्रीराम लागू हे देव न मानणारे देवमाणूस होते हे मात्र नक्की. मनच काय मेंदू सुद्धा त्यांचं अस जाणं स्वीकारत नव्हता. सगळ्यांच्या स्टेटस ला हेच होत “नैसर्गिक अभिनयाचे मास्तर” ते “नटसम्राट” अनेकविध शब्दात व्यक्त होत होत ते त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम.
माझे डोळे वाचत होते आणि मन मात्र गेलं होतं २००७ या वर्षात. मी त्यावेळी म्हैसूर विद्यापीठात डॉ. चंदर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी नाटकावरील इंग्रजी नाटकांचा प्रभाव या विषयावर पीएचडी करत होते. आणि याच अभ्यासाचा भाग म्हणून मी नटसम्राट या नाटकावर केलेल्या शोधनिबंधाची निवड अब्रेस्टवेथ विद्यापीठाने आयोजित केलेल्या कॉन्फरन्स मध्ये सादरीकरणासाठी झाली होती. वि. भा. देशपांडे यांचा नाट्यकोश चाळत असताना मला श्रीराम लागू यांच्या घरचा पत्ता मिळाला. काय मनात आले कोणास ठाऊक पण मी त्यांना एक पोस्टकार्ड पाठवले आणि त्यात विनंती केली की मी नटसम्राटवरील शोधनिबंध सादर करण्यासाठी ब्रिटनला जाणार आहे आणि मला यासाठी तुमची थोडी मदत हवी आहे. खाली मी माझा फोन नंबर आणि मी पुण्यात केव्हा येणार ते लिहिले होते. पत्र पोस्टात टाकून दिलं आणि मी त्याबद्दल विसरूनही गेले. अजूनही आठवत फेब्रुवारी महिना होता. 7 मार्चला मी पुण्यात आले. रात्रीचे साडेसात वाजले होते मी जेवत असतानाच फोन वाजला. नंबर बघितला तर पुण्याचा लॅण्ड लाईन नंबर होता. कोण असेल असा विचार करत फोन उचलला आणि पलीकडून भारदस्त आवाजात विचारलं गेलं आपण मनिषा पाटील बोलताय का? मी गोंधळात पडले होते नकळत हो म्हणून गेले आणि पुढचं वाक्य ऐकल्यानंतर एक सेकंद माझा श्वास थांबला कारण पलीकडच्या व्यक्तीने सांगितलं “मी डॉ श्रीराम लागू बोलतोय. आपण मला पत्र पाठवले होते त्यासंदर्भात बोलायचं होत. तुम्ही माझ्या घरी येऊ शकाल का? म्हणजे आपल्याला सविस्तर बोलता येईल. आणि येण्याआधी फोन करा म्हणजे मला लक्षात येईल” . एवढा मोठा कलाकार माणूस आणि माझ्यासारखी एक संशोधन करणारी विद्यार्थिनी जी आपण लिहिलेल्या पत्राबद्दल सगळं विसरून गेली होती. पण सरांनी मात्र लक्षात ठेवून मला फोन केला होता. ना अहंकार की गर्व आपण एवढे मोठे असल्याचा. मी त्यानंतर एक वेगळ्याच दुनियेत वावरत होते. श्रीराम लागू सर स्वतः माझ्याशी बोलले… चिमटा काढून मी खरेच वास्तवात असल्याचं स्वतःलाच जाणवून दिल. एक साध्या पोस्टकार्ड वर लिहिलेला तो मजकूर पण लागू सरांनी त्याला गांभीर्याने घेतलं. रंगभूमीवर मनस्वी प्रेम करणाऱ्या सरांनी माझी विनंती तर स्वीकारलीच पण मोठ्या मनाने मला मी ज्या दिवशी पुण्यात पोहोचले त्या दिवशी संध्याकाळी आठवणीत ठेऊन फोन केला यातच त्यांचं अभाळाएवढ मन दिसत. त्यांच्या या कृतीने मी भारावून गेले. तो अनमोल क्षण मी मनाच्या कुपीत अलगद जपून ठेवलाय. आजही मला त्यांचं आपुलकीने विचारणं आठवत “तुम्हाला माझं घर सापडेल ना?” आणि कसे यायचे हे अगदी लहान मुलीला समजवावे तसे त्यांनी समजावून सांगितले होते.
माझा पेपर त्यांच्या मार्गदर्शनामुळे उत्तमच झाला. पण हा अनुभव त्यापलीकडे मला आयुष्यभरासाठीची शिकवण देऊन गेला. माणसाने कितीही मोठं झालं तरी पाय जमिनीवर रोवून उभं रहावं. कदाचित म्हणूनच श्रीराम लागू सर देव न मानणारा पण तरीही अभाळाएव्हढा मोठा देवमाणूस होते. या देवमाणसाचा परिसस्पर्श माझ्या आयुष्याला झाला आणि खरंच माझं आयुष्य सोन्याहून मोलाचं झालं. या अभाळाएव्हढ्या मोठ्या माणसाची आठवण मनात नेहमीच राहील. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.
डॉ. मनिषा आनंद पाटील
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा