आम्ही सावित्रीच्या लेकी!! ‘स्मितालय’ च्या विद्यार्थिनींनी नाकारली २२ जानेवारीची सार्वजनिक सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या स्मितालय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही सुट्टी नाकारली आहे. “आम्हाला प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको आहे, आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही” असे म्हणत या विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी सुट्टी घेण्यास नकार दिला आहे.

नुकतीच झेलम परांजपे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं….. सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर…. आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार….”

सध्या संपूर्ण देशभरामध्ये अयोध्येच्या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावे, त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे सुट्टीची मागणी केली होती. तसेच अनेक आमदार आणि खासदारांनी ही 22 जानेवारी रोजी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीला विचारात घेऊनच राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मात्र या सगळ्यात ‘स्मितालय’ विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारून सुट्टीपेक्षा अभ्यास आणि शाळा महत्त्वाची आहे, ही स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता 22 जानेवारी रोजी स्मितालय विद्यालय सुरूच राहणार आहे. सध्या झेलम परांजपे यांनी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्यांचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.