धूम्रपान केल्यास मेंदूचा आकार लहान होतो; संशोधनातून आली धक्कादायक माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| धूम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे हे आजवर आपण अनेकवेळा ऐकले आहे. परंतु धूम्रपान केल्यास मेंदूचे आकुंचन देखील होते असे नवे संशोधन समोर आले आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू लहान होत जातो. तसेच तो मूळ स्थितीत राहत नाही अशी धक्कादायक माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनामध्ये धुम्रमान फक्त हृदय किंवा फुफ्फुसावरच नाही तर मेंदूवर देखील परिणाम करतो असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

धूम्रपान केल्यास मेंदूचे आकुंचन होते

समोर आलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या काही संशोधकांनी एक नवे संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये त्यांनी दावा केला आहे की, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती लवकर कमी होत जाते. तसेच त्यांना अल्झायमर असा रोग देखील होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, धूम्रपान केल्यामुळे मेंदूचे आकुंचन देखील होते. तो पुन्हा कधीच मूळ आकारात येत नाही. परंतु धूम्रपान करणे सोडल्यास मेंदूच्या ऊतींचे अधिक नुकसान होत नाही.

स्मरणशक्ती जाते

धक्कादायक बाब म्हणजे या संशोधनातून असे समोर आले आहे की, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती जाण्याचा अधिक धोका आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अल्झायमर रोग होऊ शकतो. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू वृद्ध होत जातो. त्यामुळे शरीरासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी धूम्रपान अधिक धोकादायक ठरू शकते. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर धूम्रपान करणे सोडणे महत्वाचे आहे.

दरम्यान, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी वेगवेगळ्या वयोगटातील 32,094 लोकांवर संशोधन केले होते. या संशोधनामध्ये त्यांनी व्यक्तींच्या मेंदूंवर अभ्यास केला. यामधूनच ही बाब समोर आली की, धूम्रपान करणे व्यक्तीच्या मेंदूसाठी घातक ठरू शकते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मेंदू फक्त धूम्रपान केल्यामुळे लहान होऊ शकतो.