राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मात्र यानंतर भाषण संपवून राजस्थानला निघालेल्या राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. राहुल गांधी बाहेर जाताना त्यांनी फ्लाईंग किस दिल्याचा अतिशय गंभीर आरोप स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी लावला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत मंगळवारपासून चर्चा सुरू झाली असून त्यावर आज राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. प्रस्तावाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांनी आपल्या परखड भाषणातून भाजपला धारेवर धरल. सुमारे एका तासानंतर राहुल गांधी यांचे भाषण संपवून ते राजस्थान दौऱ्यावर जाण्यासाठी संसदेतून बाहेर पडले. मात्र याचवेळी त्यांनी सभागृहातच फ्लाईंग किस केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधींवर गंभीर आरोप करत, “असे कृत्य केवळ महिलाद्वेषी मनुष्य करू शकतो. संसदेत असं कृत्य करणं अशोभणीय आहे. राहुल गांधी यांच्या कृत्याने संसदेची गरिमा राहिलेली नाही. याआधी असं कृत्य कोणत्याही खासदाराने केलेलं नाहीये. त्यांच्याविरोधात भाजपच्या सर्व महिला खासदार आम्ही अध्यक्षांकडे दाद मागू, त्यांच्यावर कारवाई केली जावी” अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली आहे. तसेच, ज्यांना आज माझ्या आधी भाषण करण्याची संधी मिळाली ते संसदेत फ्लाइंग किस देऊन निघून गेले” अशी टीका इराणी यांनी केली आहे.

दरम्यान आजच्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर घटनेबाबत चांगलेच सुनावले आहे. यावेळी बोलत असताना, “काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.