मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असला तरी यातून चांगला प्रतिसाद रेल्वेला मिळाला तर हा निर्णय पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. आता जास्त उत्सुकता न तणावता हा कोणता निर्णय ते पाहूयात.
लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये थांबा
मध्य रेल्वेने प्रवाशांचा विचार करता काही महत्त्वाच्या गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये दोन मिनिटांचा थांबा मंजूर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑक्टोबर पासून करण्यात आली असून थंड हवेचे ठिकाण असणारा लोणावळा इथे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना या ट्रेनच्या थांब्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरातून पर्यटक वीकेंडला लोणावळ्याला हजेरी आवर्जून लावत असतात. त्यांना आता थेट लोणावळा स्टेशनवर उतरता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून येथील पर्यटन व्यवसायाला सुद्धा चालना मिळणार आहे. लोणावळ्याला जात असताना अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे तासंतास वाहतुकीमध्ये प्रवाशांना अडकून राहावे लागते मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासी थेट मुंबई आणि पुण्याहून लोणावळ्याला जाऊ शकतात.
कोणत्या रेल्वे गाडयांना थांबे ?
- 12163 लोकमान्य टिळट टर्मिनस- एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळ टर्मिनस एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी लोणावळ्यामध्ये रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी पोहचेल आणि 8 वाजून 58 मिनिटांनी पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
- 12164 – एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळ टर्मिनस – या एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर लोणावळ्यात 10 तारखेपासून थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी लोणावळ्यात दाखल होईल आणि 12 वाजून 42 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल.
- 11139 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हौसपेठ – या ट्रेनला 10 ऑक्टोबरपासून लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. हा थांबा रात्री 11 वाजून 51 मिनिटं ते 11 वाजून 53 मिनिटांदरम्यान असणार आहे.
- 11140 – हौसपेठ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अप मार्गावरील या ट्रेनला लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा दिला जाणार आहे. हा थांबा ही ट्रेन रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी लोणावळा स्थानकात दाखल होईल आणि ती 2 वाजून 7 मिनिटांनी पुढे प्रस्थान करेल.
सुविधेचा लाभ घ्या
दिवाळी सणानिमित्ताने अनेकजण कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. तुमही देखील लोणावळा फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर रेल्वेमार्गे तुम्ही थेट लोणावळा गाठू शकता. अधिक माहितीसाठी प्रवासी https://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच एनटीईएस या अॅप्लिकेशनवरही ही माहिती उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.