कराड बाजार समितीचे मतदार हैदराबाद, गोवा सहलीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप पक्षातील पुढारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बाजार समितीचे काही मतदार हैदराबाद, सहलीवर गेले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या 8 अशा सातारा, कराड, पाटण, वाई, कोरेगाव, फलटण, वडूज आणि लोणंद या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे राजकीय वातारण तापलं आहे. या निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यात उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर तर कराड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, फलटण तालुक्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, वाईला आमदार मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कराड बाजार समितीच्या निवडणुकीतील चुरशीमुळे कराडात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येथील बाजार समितीच्या एका पॅनेलच्या काही मतदारांना हैदराबाद, गोवा सहलीवर पाठविण्यात आले आहे. महिला मतदारांना सहलीवर जाणे शक्य नसल्याने त्यांच्या पतीराजांना सहलीवर पाठवून खूष करण्यात आले आहे. कराड बाजार समिती निवडणुकीत यंदा धनशक्तीचा वापर केला जात असल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहेत.