वाढीव कट्टा | आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल. स्वीडिश नागरिक. २१ ऑक्टोबर १८३३ रोजी यांचा जन्म झाला. १० डिसेम्बर १८९६ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी सेंट रेमो इटली येथे अल्फ्रेडचा मृत्यू झाला.
डायनामाईट या स्फोटकाचा शोध अल्फ्रेडने लावला होता. डायनामाईटचा वापर लोकांच्या कल्याणापेक्षा लोकांना उध्वस्त करण्यासाठीच अधिक केला जाऊ लागला. दरम्यान लुडविग नोबेल या आल्फ्रेडच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन वर्तमानपत्रांनी ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचा मृत्यू’ या मथळ्याखाली त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती. ही बातमी लिहणाऱ्या पत्रकाराला डायनामाईटचा शोध गुडविगने लावला असल्याची चुकीची माहिती मिळाली होती, आणि त्याने ती तशीच छापली. या घटनेमुळे अल्फ्रेडला मनोमन खूप वाईट वाटलं. आपल्या मृत्यूनंतरसुद्धा जग आपल्याला असंच ओळखणार का? या प्रश्नाने तो व्यथित झाला आणि त्याने इथून पुढे जग आपल्याला, आपल्या कुटुंबाला वेगळ्या नावाने लक्षात ठेवेल असा निर्धार केला.
आयुष्यात संशोधनातून मिळवलेला पैसा त्याने बँकेत जमा केला. या पैशांचा वापर आपल्या मृत्यूपश्चात विज्ञान आणि साहित्य हा मूलभूत विषय डोळ्यांसमोर ठेवून या विषयात वैश्विक पातळीवर उपयोगी आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना पारितोषिक देण्यासाठी करण्यात यावा अशी इच्छा नोबेलने व्यक्त केली. २७ नोव्हेंबर १८९५ रोजी लिहल्या गेलेल्या आपल्या मृत्युपत्रात आपल्या संपत्तीचा ९४% हिस्सा त्याने स्वीडिश नॉर्वेयन क्लब इन पॅरिसच्या नावावर केला. हीच रक्कम पुढे दीर्घकाळ पुरस्कारासाठी वापरण्यात आली. सुरुवातीच्या काळात ५ विषयांसाठी नोबेल पारितोषिक दिलं जात होतं. १९६८ साली स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने आल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ अर्थशास्त्र या विषयातील नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९०१ साली नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. १९६९ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल दिलं जाऊ लागलं. मागील ११९ वर्षांत २०१९ च्या पुरस्कारांसहित ५९६ वेळा या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ९२२ लोकांना आणि २७ संस्थांना हा पुरस्कार दिला गेला आहे. शांततेच्या नोबेल परितोषिकाचं वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी तर उर्वरित ५ पुरस्कारांचं वितरण स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी करण्यात येतं. मृत व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येत नाही. महात्मा गांधींचं या पुरस्कारासाठी ६ वेळा नामांकन होऊनसुद्धा त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. अखेर नोबेल पुरस्कारापेक्षा गांधीजींचं कार्य मोठं असल्याचा निर्वाळा नोबेल समितीने दिला.