हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण याचा विचार करतो तेव्हा अनेकजण महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, किंवा कपिल देव , विराट कोहली यांचे नाव घेतात. धोनी आणि रोहित आणि कपिल देवने भारताला विश्वचषक सुद्धा जिंकून दिलेत. मात्र या सर्वांपेक्षा पश्चिम बंगालचा महाराजा सौरव गांगुली (Sourav Ganguly) हाच भारताचा महान कर्णधार आहे असं मत इंग्लंडचा माजी खेळाडू डेव्हिड लॉयडने व्यक्त केलं आहे. टॉकस्पोर्ट क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना डेव्हिड लॉयडने गांगुलीचे तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित शर्मा, एस धोनी (एमएस धोनी) आणि कपिल देव यांच्यामध्ये सर्वात महान कर्णधार कोण आहे? असा सवाल केला असता लॉइडने मात्र सौरव गांगुलीचे नाव घेत वेगळंच उत्तर दिले.
डेव्हिड लॉयड म्हणाले, सौरव गांगुली कर्णधार होताच भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आली. गांगुलीने विरोधी संघालाही विचार करायला भाग पाडले. सौरवने विरोधी संघाशी डोळ्यात डोळ्यात घालून खेळण्यास सुरुवात केली. सौरवने भारतीय क्रिकेट बदलले. भारतीय क्रिकेट संघाला आज जे काही यश मिळत आहे त्यामागे सौरव गांगुलीची आक्रमक विचारसरणी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी त्यांनी एक खास उदाहरणही दिले. लॉयड म्हणाले, तुम्ही पहा, मुंबईतील विजयानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने त्याचा टी-शर्ट काढला. याचाच बदल गांगुलीने लॉर्ड्सवर घेतला. स्लेजिंगला प्रत्युत्तर कस द्यायचं ते गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारत शिकला. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय खेळाडूंनी अशी आक्रमकता दाखवली जी कांगारूंनी यापूर्वी कधीही भारतीय खेळाडूंकडून पाहिली नव्हती. सौरवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले. म्हणूनच मी सौरव गांगुलीला भारताचा महान कर्णधार मानतो असं म्हणत लॉयड यांनी गांगुलीचे कौतुक केलं.
दरम्यान, खरं तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या सावटाखाली असताना गांगुलीने अतिशय जबाबदारीने संघाचे नेतृत्व केलं.. भारतीय संघ परदेशात जाऊनही सामना जिंकू शकते.. विरोधी संघाने आरे केलं कि त्याला कारे करू शकते हेच गांगुलीने आपल्या आक्रमक नेतृत्वात संपूर्ण जगाला दाखवून दिले. युवराज सिंग, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंघ धोनी, हरभजन सिंग अशी युवा खेळाडूंची फळी गांगुलीने उभारली आणि एक मजबूत संघ बांधला. २००३ च्या वर्ल्डकप मध्ये गांगुलीच्या नेतृत्वखालीच भारत अंतिम फेरीत गेला होता, मात्र अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.