समाजाला योग्य दिशा देणाऱ्या ‘लाटालहरी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुस्तकांच्या दुनियेत | मयुर डूमणे

भारतातील पुरुषप्रधान व्यवस्थेत बहुतांश कुटुंबातील निर्णय हा त्या कुटुंबातील कर्ता पुरुष घेतो.कौटुंबिक निर्णय घेताना चर्चा वाद-विवाद होत नाहीत त्यामुळे लोकशाही ही केवळ शासनप्रणाली नसून ती एक जीवनपद्धती आहे आणि त्याची सुरवात घरापासून झाली पाहीजे.’बहुमताने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य असतात असं नाही’ हे विधान लोकशाहीच्या मर्यादा स्पष्ट करतं. लोकशाही मार्गाने घेतलेल्या निर्णयांना लोकशाही मूल्यांची जोड असणं आवश्यक आहे.लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीच्या मर्यादा काय आहेत? उतावीळ लोकांना हुकूमशाहीच आकर्षण का वाटत? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लाटालहरी’ या विनोद सिरसाट यांच्या पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात अत्यन्त सोप्या, सहज भाषेत मिळतात.लोकशाही व्यवस्थेत देशाचा नागरीक म्हणून विचारपूर्वक मतदान कसं करावं याचं सुंदर विश्लेषण देखील या पुस्तकात केले आहे. कधी पक्ष चांगला असतो तर उमेदवार वाईट असतो अशा वेळी त्या उमेदवाराला मतदान न करून त्या पक्षाला असा उमेदवार लादू नका असा संदेश देणं गरजेचं आहे. लेखकाने कोणतीही राजकीय भूमिका नसणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी मतदान करताना ज्या पंचसूत्रीचा विचार करायला सांगितला त्या पैकी हे एक सूत्र. मी माझं मतदान कोणत्या उमेदवाराला देऊ हा जो सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो त्याच उत्तर म्हणजे या पुस्तकात मांडलेली पंचसूत्री. मतदान केलं म्हणजे आपली लोकशाहीतील जबाबदारी संपली असा अर्थ होत नसून निवडून आलेलं सरकार लोकशाही मार्गाने राज्यघटनेशी बांधील राहून नीट काम करतेय का नाही असं लक्ष ठेवणं, काम नीट करत नसल्याचं सरकारला प्रश्न विचारणं हे देखील मतदान करण्याबरोबर तेवढंच महत्वाचं आहे.

“माझ्या देहाची फाळणी आधी होईल मग देशाची”, असं म्हणणाऱ्या गांधींजींनी फाळणीला मान्यता का दिली? पाकीस्तानला 55 कोटी रुपये द्यावेत म्हणून गांधीजींनी उपोषण केलं होतं की दिल्लीत चालू असलेले राजकीय दंगे थांबावेत म्हणून उपोषण केलं होतं? गांधींजींना भगतसिंगची फाशी रोखता आली असती का? गांधींजींनी सुभाषचंद्र बोस यांना का विरोध केला? अशा अनेक प्रश्नांची विवेकी उत्तरे ‘गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा’ या पुस्तकातील प्रकरणात वाचायला मिळतात. ‘आंधळ्याची काठी’ या तिसऱ्या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका मांडली आहे. विवेकवादाचा वसा घेऊन बुद्धिप्रामाण्यवादाकडे वाटचाल करायची असं ध्येय असणाऱ्या अंनिस च्या चळवळीला योग्य दिशा मिळावी यासाठी लेखकाने ‘चतुःसूत्री’ सांगितली आहे. लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करायला लावणं हे त्यातील मला महत्वाचं सूत्र वाटतं. समाजाची जडणघडण करण्यासाठी समाजात वाचनसंस्कृती रुजणे किती गरजेचे आहे, पुस्तकांच आणि वाचनाचं मानवी जीवनातील महत्व किती आहे हे ‘नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते’ या प्रकरणात समजावून सांगितलं आहे. माणूस वाचन करतो, या वाचनांमुळे तो विचार करतो,त्याला प्रश्न पडतात आणि या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणून तो लेखन, संवादातून व्यक्त होतो. मला या पुस्तकाने विचार करायला लावलं म्हणून मी यावर व्यक्त होतोय आणि हे पुस्तक समाजाला पुढे नेण्यासाठी उपयोगी आहे त्यामुळे अनेकांनी वाचलं पाहीजे या उद्देशाने मी लिहितोय. पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर लिहिताना मला पुन्हा नीट विचार करून लिहावं लागतं. वाचताना जेवढा विचार करावा लागतो त्यापेक्षा अधिक विचार लिहिताना करावा लागतो. या वैचारिक प्रक्रीयेमुळे माझं या पुस्तकाविषयीच आकलन वाढतं.

काळानुसार अपडेट न झालेल्या, शिक्षकी पेशाची आवड नसून देखील केवळ गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठी शिक्षक झालेल्या शिक्षकांमुळे शिक्षकी पेशा बदनाम झालाय. शिक्षक झाल्यावर ज्या शिक्षकातील विद्यार्थी मरतो असे शिक्षक या शिक्षणव्यवस्थेला ओझे झाले आहेत. आजन्म विद्यार्थी राहिलात तरच तुम्ही चांगले शिक्षक होऊ शकता असे लेखकाने मांडलेले स्पष्ट मत मनापासून पटणारे आहे. शेवटच्या प्रकरणात लेखकाने 99 % सुखी होण्याचा मूलमंत्र दिलाय. ‘जीवनसाथी’ आणि ‘व्यवसाय’ या दोन्हींची निवड करणं आणि त्यांच्याशी जुळवून घेणं, ही आजच्या तरुणाईपुढील मुख्य आव्हानं आहेत. ही आव्हानेच 99% सुखी होण्याचा मूलमंत्र आहेत.

कमी शब्दांत सखोल आणि सोप्या भाषेत विषयाची मांडणी करणारं, महत्वाचं म्हणजे वाचकाच्या विचारांना चालणा देणारं पुस्तक हे चांगलं पुस्तक असतं. विनोद शिरसाट या साधनेच्या संपादकांच्या विचारांतून निर्माण झालेल्या या ‘लाटालहरी’ विवेकी आणि सक्षम समाज घडविण्यासाठी मला खूप महत्वाच्या वाटतात. केवळ एक दोन तासात वाचून होणारं 65 पानांच हे पुस्तक बहुमूल्य मार्गदर्शन करतं आजच्या तरुणाईने हे पुस्तक जरूर वाचावं.

विनोद शिरसाठ यांनी 2004 या वर्षी ‘लाटालहरी’ आणि 2005 या वर्षी ‘थर्ड अँगल’ ही दोन पाक्षिक सदरे लिहिली. तरुणाईला योग्य वैचारिक दिशा मिळावी या करिता या पाक्षिक सदरांतील निवडक लेखांचे रूपांतर पुस्तकांत केलं आहे. 2004 पाच साली केलेलं लेखन आजच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा सुद्धा मला अधिक महत्वाचे वाटते.

Leave a Comment