आपल्यासारखंच पेशंटना पण कुटुंब आहे ना राजा? मग आपण डॉक्टर असताना त्यांना न वाचवता घरी थांबून कसं चालेल??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरोनाशी झुंज देत असताना १२ तास पीपीई किटच्या सोबत काढताना डॉक्टरांची अवस्था काय होते? डॉक्टर लोकं घरी गेल्यावर त्यांच्या कुटुंबियांच्या मनात काय धाकधूक असते? ५० लाखांचा विमा असला तरी आपल्या लोकांसोबत जास्त काळ जगावं असं वाटण्याचा हक्क डॉक्टरांना आहेच ना? सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. शुभांगी मोरे यांचा चिरंजीव आदित्य मोरे याने घेतलेला आईच्या कष्टांचा आणि भूमिकेचा आढावा. हे कौतुक वैयक्तिक असलं तरी प्रातिनिधिक स्वरुपात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कोविड योध्याला सलाम..!!

टीम हॅलो महाराष्ट्र

लढा कोरोनाशी | आदित्य मोरे

मार्च 2020, कॉलेज, लेक्चर्स, प्रॅक्टीकल, कँटीन सगळं कसं व्यवस्थित आणि मजा मस्तीत चालू होतं. रस्त्यावर नेहमीसारखी प्रचंड वर्दळ, हॉटेलच्या पार्ट्या, चहाच्या टपरीवर वाफाळलेल्या चहा सोबत चटपटीत गप्पा सगळं कसं यथासांग चालू होतं. पण काळाची चाकं फिरली आणि परिस्थिती प्रचंड बदलली. वास्तविक कोरोनाचं संकट डिसेंबर- जानेवारी पासून ओढवलं होतं परंतु साताऱ्याला झळ लागायला मार्च उजाडला. माणसं माणसापासून लांब लांब पळायला लागली. परिणामी सरकारला पावलं उचलायला लागली. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा ठप्प झाल्या, कामगार- कच्चा माल- भांडवल- मागणी यांसारख्या supply chain तुटून कारखाने थांबले, चाकरमानी आपापल्या गावाला परतू लागले. कोरोनाच्या धास्तीने माणुसकीचा ओलावा सुकला आणि उरला तो पाषाण हृदयी आणि आत्मकेंद्री झालेला माणूस. पण अश्या कठीण प्रसंगात देखील काही माणसं अशी समोर आली ज्यांनी इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यायची जबाबदारी स्विकारली. खाकी वर्दीमध्ये, पांढऱ्या apron मध्ये, आरोग्य विभागाच्या गणवेशमध्ये साक्षात परमेश्वर पृथ्वीवर अवतरला माणसांचं रक्षण करायला. कोरोना ने सगळीकडे हाहाकार माजवला होताच परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे देशभक्ती आणि देशसेवेची व्याख्याच बदलली. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्यांना warrior म्हणून सन्मानित केलं.

कोविड योद्धा – डॉ. शुभांगी मोरे

आपली आई हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो. पहिली मैत्रीण आणि पहिला गुरू. तिचं आपल्या आयुष्यातील स्थान आणि प्रेम यांची तुलना इतरत्र नाही होऊ शकत. माझीही गोष्ट अशीच. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे आपण त्याला civil hospital म्हणतो तिथं माझी आई medical officer म्हणून काम पाहते. आमच्या इन मिन तीन जणांच्या कुटुंबात आम्ही कधीच सरकारी दवाखाना म्हणून अस्वच्छता, चुकीची वागणूक, सदोष ट्रिटमेंट असले आरोप करून त्यावर बोट ठेवलं नाही. परंतु कोरोना मुळे सरकारी दवाखाना हा एकमेव पर्याय लोकांपुढे दिसायला लागला. आणि जसे जसे civil मध्ये positive patient दाखल व्हायला लागले, तेव्हा मात्र आमच्या मनात भीती निर्माण झाली. बाबा आणि मी दोघांच्या मनाला सांगता न येणारी आणि त्यावर उपाय नसणारी भीती वाटायला लागली. माझी आई तिथं रोज जातीये, तिथल्या वातावरणामुळे तिला काही झालं तर?, तिच्या माध्यमातून विषाणू घरी आला तर?, ती जरा ठसकली, शिंकली तरी काय झालं असेल? त्रास होत असेल का? आम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून लपवून ठेवत असेल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा भडिमार मनातल्या मनात होऊ लागला.. “आता काय करायचं?” मी बाबांना विचारलं. प्रश्न तर गंभीर होता. ‘एक महिन्याची वैद्यकिय रजा टाकून स्वस्थ घरी बसावं’ या विचारावर दोघांचं एक मत झालं. आमचा विचार आम्ही आईला सांगितला, पण दरवेळी आमच्या मताशी सहमत असलेली आई यावेळी मात्र पूर्ण वेगळी होती.

“मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं, माझ्या वडिलांनी कर्ज काढून माझ्या शिक्षणाचा खर्च पेलला. जेव्हा मी डॉक्टर होऊन बाहेर पडले तेव्हा खूप मोठी सामाजिक जबाबदारी आली होती. डॉक्टर म्हणजे नुसतं खुर्चीवर बसून औषधं लिहून देऊन खूप पैसे कमावणे नाही. ही नुसती पदवी किंवा पद नाही जबाबदारी देखील नाही. डॉक्टर च्या पदासोबत जबाबदारी आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी येऊन पडते. लहान मूल बाहेर खेळतं, पावसात भिजतं, आजरी पडतं म्हणून त्याची आई त्याला असंच सोडून नाही देत. आज या वैश्विक संकटाने नागरिक आजारी पडत आहेत आणि मी त्यांना तसंच सोडून रजा टाकून घरी बसू?.. मग आपण माणूस म्हणून काय राहिलो बाळ?” आई म्हणाली. लहानपणी मी आजारी पडल्यावर काळजी घेणारी माझी आई, आज इतर नागरिकांची देखील त्याच आत्मीयतेने काळजी घेत होती. “अगं, पण तूच इतकं सिरियस का घेतीयेस बाकी डॉक्टर आहेत ना” माझ्या प्रश्नातून काळजी डोकावलेली तिनं पाहिली. “त्यांना फॅमिली नाहीये का?” मी एका वाक्यात गप्प झालो, त्या वाक्यातून त्या डॉक्टरांची मुलं, आणि घरचे सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. त्यांना वाटणारी काळजी आणि आपल्याला वाटणारी काळजी यात काय अंतर होतं? हे सगळं कळत होतं मला देखील पण मन मानायला तयार नव्हतं. मी माझ्या आईला तिच्या जबाबदारी पासून लांब नेतोय का? की मी माझ्या आईला ‘धोक्याच्या ठिकाणी काम कर; आम्हाला चालेल’ असं सांगतोय? ह्या द्विधा मनस्थिती मध्ये काय करणे अपेक्षित होतं.. मीच मला प्रश्न विचारत होतो आणि पुन्हा निरुत्तरीत होत होतो माझ्याच समोर. मी माझ्या मनाचा सामना करू शकत नव्हतो तर आईला मानसिक आधार कुठून देणार होतो? “आई तू डॉक्टर का झालीस? झाली नसतीस तर एवढं करायलाच लागलं नसतं” माझा भाबडा प्रश्न. हळू हळू लहान असताना हट्ट करायचो, तेच मूल बाहेर येऊ पाहत होतं; आईला थांबवू पाहत होतं. ‘नको ना जाऊस’ छोटा आदित्य केविलवाणा झाला. तेव्हा आईनं त्या छोट्या आदित्यला सांगितलं, “बाळा, अरे का घाबरतोयस तू? आजपर्यंत हजारो रुग्ण बरे केले आहेत त्यांच्या सदिच्छा, तुमचं प्रेम, परमेश्वराचा आशीर्वाद सगळं पाठीशी आहे माझ्या. मला नाही काही होणार. पण मी पळून आले लपून बसले तर तुला तुझी आई मिळेल पण समाजाला डॉक्टर नाही मिळणार. सैन्यात जर समोर शत्रू उभा असेल तर आपला कुठलातरी जवान पळून आला असं ऐकलंयस का तू? मग आज आपल्यासमोर विषाणू शत्रू बनून उभा आहे तर मी का पळून येऊ? लेकरा, सर्वे सन्तु निरामय: हा आम्हा डॉक्टरांचा धर्म आहे. आणि धर्म सोडून पळून येणं आपली संस्कृती नाही. उद्या तू मिलिटरी मध्ये असतास आणि युद्धपरिस्थिती असती तरी मी तुला नसतं अडवलं” मी खूप गहिवरून गेलो होतो. मुळातच हळवा असल्यानं माझ्या भावना कधीकधी डोळ्यातून बाहेर पडतात. मी होकारार्थी मान डोलवली आणि शांत बसलो.

कोरोना वाढतच चालला होता. चाचणी साठी संशयितांचे स्वॅब घेणं चाललं होतं. सगळंच नवीन. आम्हाला पण टेन्शन आलं होतं, काय होणार.. 10-15 स्वॅब होते. ते झाले आता रिपोर्ट कधी येणार? त्या 10-15 जणांपेक्षा आम्हाला जास्त आतुरता आणि टेन्शन होत त्यांच्या रिपोर्ट्स चं. दोन दिवसांनी रिपोर्ट्स आले तो पर्यंत म्हणजे सगळेच काळजीत होतो. सुदैवानं सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. आमची पहिलीच वेळ. घरात अक्षरशः आनंदोत्सव साजरा झाला. आपल्या भारतीयांना अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला खूप छान जमतो. झालं, आनंद झाला.. पण मग परत दोन दिवसांनी स्वॅब आले. यावेळी संख्या जास्त होती. मग मी एका प्रशिक्षित डॉक्टर ला स्वॅब कसे घ्यायचे याबद्दल सांगू लागलो. बाबा तर हसलेच पण आई पण खूप हसली. पण बऱ्याच दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर इतकं हसू दिसत होतं. कोरोना सुरू झाल्यापासून सगळ्या मेडिकल कर्मचाऱ्यांना, पोलिसांना खूप ताण आहे हे जाणवत होतं. पण थोडा वेळ का होईना माझा शूर योद्धा हसला.. बघून खूप बरं वाटलं. त्यानंतर मात्र आईने शेकडो स्वॅब घेतले. त्यातले बरेच पॉझिटिव्ह देखील आले. पण आज मात्र सगळं अगदी रोजच्या सारखं रुटीन चालू आहे. आईला आता तिची रविवार ची सुट्टी मिळत नाही. आठवड्यातून 3-4 वेळा खावली, पानमळेवाडी अशा शासनाच्या quarantine center मध्ये जाऊन 200-250 रुग्णांचा राउंड घ्यावा लागतो, आठवड्यातून 2 दिवस 12 तासांची ड्युटी करावी लागते, वेळेवर जेवण नाही, सतत PPE किट घालून गुदमरणारा श्वास.. सगळं सोसतोय हा योद्धा, पण हसऱ्या चेहऱ्याने कारण आम्हाला टेन्शन येऊ नये. घरातील आई रोजच्या कामाने दमून जाते, तिथल्या दगदगीला देखील कंटाळते. पण नेहमी सकारात्मक बोलते, आणि हसत असते. तिच्या उर्जेकडे पाहून आम्हाला ताकद येते. खूप सहन करतेस ग आई, आणि मला तुझा अभिमान आहे.

आज साधारण 5 महिने होतील, आपण कोरोनाशी झुंज देत आहोत. या सगळ्या यंत्रणेवर खूप ताण आहे. पोलिसांना लोकांना कसं समजवायचं हे कळत नाहीये, तर मेडिकल कर्मचाऱ्यांना हा वाढता आकडा कसा थांबवायचा हे कळत नाहीये. मी हे सगळं अगदी जवळून पाहतोय. हे सगळे योध्दे वरून खूप कणखर दिसत आहेत. पण त्याना होणाऱ्या मानसिक तणावाची आपण कल्पना नाही करू शकत. उगीचच गर्दी करून उलट पोलिसांवरच डफरणाऱ्या लोकांकडे पाहून एका पोलिसाच्या डोळ्यातले भाव शब्दात नाही सांगता येणार. प्रसंगी देवाचा अवतार घेऊन आपले जीव वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस वर जेव्हा हल्ला होतो, त्यांची अवहेलना होते तेव्हा त्यांची शांतता मात्र खूप बोलून जाते, मात्र आपल्याला कळत नाही. एखादा सफाई कर्मचारी दारात येतो आणि तो आल्यावर घराचे दार लावणाऱ्यांवर गालातल्या गालात हसतो. त्या हसण्यामागची वेदना त्याची त्यालाच माहिती असते. माझ्या आई सारखे अनेक योध्ये आपल्यासाठी रणांगणावर उभे आहेत. देशभक्ती आणि राष्ट्रीय कर्तव्याची व्याख्या बदलणाऱ्या या कोरोनाच्या घटनेने जितकी हानी केली तेवढं शिकवलं देखील. या सगळ्या योद्ध्यांची जिद्द, मेहनत या विषाणूला हरवतील हे नक्की. पण आपण सगळं त्यांच्यावर नाही ना सोपवू शकत. आपली देखील काही कर्तव्य आहेत. योद्ध्यांची मानसिकता थोडी खचली आहे, आपण त्यांच्यात सकारात्मकता तयार करूयात. ते लढत आहेतच पण त्यांच्या खांद्यावर आपण हात ठेवून त्यांना सामर्थ्य देऊयात. कोणा एकासाठी हातात शस्त्र घेऊन उभं राहणं याला खूप धाडस लागतं, आणि ती आपली माणसंच करू शकतात. हे सगळे योध्ये आपलं कुटुंब आहेत. ते आपल्यासाठी उभे आहेत आपण त्यांच्यासाठी उभे राहुयात. मानसिकतेने एकत्र येऊन कोरोना ला आव्हान देऊया. तो विषाणू नक्की हद्दपार होणार. या सगळ्या योद्ध्यांच्या लढाऊ बाण्याला, जिद्दीला, धाडसाला सलाम. मला अभिमान आहे एका लढवय्या आईचा मुलगा असल्याचा.
जय हिंद.

आदित्य मोरे हा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बीएस्सी करत आहे. सध्या तो फॉरेन्सिक सायन्स विषयाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9975399966, 9561190500

Leave a Comment