एक सफर – हरहुन्नरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष लेख । हर्षल जाधव

समाज व्यवस्थेने ज्यांना नाकारले मात्र त्यांनाच संघटित करून पुन्हा एकदा जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची उद्या ६ डिसेंबरला ६३ वी पुण्यतिथी. हा दिवस देशभरामध्ये महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महत्त्वाकांक्षी, लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी, स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता इ. आणि अशा बहुविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे बहुआयामी व्यक्तिमत्वच. मात्र जगाला प्रेरणा देणाऱ्या या ऊर्जास्रोतांचा प्रवास तितकासा सोपा नव्हता.

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशमधील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. मात्र त्यांचे मूळ गाव हे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेले आंबडवे गाव होते. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या लष्करी छावणीमध्ये सेवेला होते. बाबासाहेब केवळ ५ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे म्हणजेच भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिक्षणाची आवड त्यांना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आणि १९२३च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यांचा शैक्षणिक वर्षांचा प्रवास हा २७ वर्षांचा आहे. या २७ वर्षांमध्ये प्रचंड हाल-अपेष्ट आणि कष्ट सहन करून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करणारे अद्वितीय असे ज्ञानोपासक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच असावेत. बाबासाहेबांनी बी.ए, एम.ए, पीएच.डी, एम.एस्सी, डी.एस्सी आणि बार अ‍ॅक्ट लॉ अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. १९०७मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांचा प्रवास त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त करण्यापर्यंत राहिला.

भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्ती च्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जवाबदारी स्विकारली. राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील त्यांनी काम केले. हे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते. कारण जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता. इतकेच नव्हें तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार नव्हते. त्यांना या गोष्टीचा मोठा त्रास झाला. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद या गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. १९२० ला त्यांनी कलकापुरचे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली. आंबेडकरांच्या या भुमिकेने सामाजिक आणि राजनितीक क्षेत्रात खळबळ उडवुन दिली. यानंतर लोकांमधे भीमराव आंबेडकरांची ओळख निर्माण होउ लागली. १९२७ साली डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्याकरता आणि जातिगत भेदभावाला पुर्णतः संपविण्याकरता सक्रीय स्वरूपात काम केले. या दरम्यान दलितांच्या अधिकारांकरता ते लढले. या आंदोलना दरम्यान त्यांनी ही मागणी केली की सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले केले जावे आणि सर्व जातींकरता मंदिरातला प्रवेश खुला करण्यात यावा. इतकेच नव्हें तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश करतांना हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा त्यांनी कडाडुन समाचार घेतला आणि प्रतिकात्मक प्रदर्शन देखील केले.

पुढे १९३२ साली दलितांच्या अधिकारांकरता धर्मयुध्दातील योध्दयाप्रमाणे डॉ. आंबेडकरांची लोकप्रीयता वाढत गेली. लंडन मधल्या गोलमेज सम्मेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले. या सम्मेलनात आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विचारधारेचा देखील विरोध केला ज्यात त्यांनी वेगळया मतदारांविरोधात आवाज उठविला होता ज्यात दलितांच्या निवडणुकीत सहभागी होण्याची मागणी केली होती. १९३५ साली आंबेडकरांना सरकारी लाॅ काॅलेज चे प्रधानाचार्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. या पदावर त्यांनी २ वर्ष काम केलं. यामुळे डॉ. आंबेडकर मुंबईत स्थायिक झाले त्यांनी या ठिकाणी मोठे घर बांधले, या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात ५० हजारांपेक्षा जास्त पुस्तके होती. डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी १९३६ ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे १९३७ ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने १५ सीटस् जिंकल्या. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (ऑल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी १९४६ ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.

२९ ऑगस्ट १९४७ ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला. समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ २ वर्ष ११ महिने आणि ७ दिवसांच्या अथक परिश्रमाने २६ नोव्हेंबर १९४९ ला तयार करून तेव्हांचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दतीने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.

१९५० साली भीमराव आंबेडकर एका बौध्द सम्मेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले तेथे जाऊन ते बौध्द धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौध्द धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौध्द धर्मात रूपांतरीत केले. यानंतर ते भारतात परतले. डॉ. आंबेडकर १९५४-१९५५ या वर्षांमधे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. विलक्षण अश्या या कायदे पंडिताचा १४ एप्रिल १९९० साली भारत देशातील सर्वोच्च पुरस्कार असलेला भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आजच्या महापरिनिर्वाण दिनी सर्व त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा समुदाय लोटतो. अशा या हरहून्नरी , कायदेपंडित , विलक्षण, अभ्यासू, ज्ञानोपासक,कलासक्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

Leave a Comment