हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून दरमहा महिलांना पंधराशे रुपये दिले जातील. सध्या अशा अनेक इतरही योजना राज्यामध्ये महिलांसाठी सुरू आहे. या योजना नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याविषयी जाणून घ्या.
लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) – राज्यातील मुलींसाठी लेक लाडकी योजना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते ते अठरा वर्षाची होईपर्यंत सरकार एकूण 1 लाख 1 हजार रुपये प्रदान करते. या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना घेता येऊ शकतो. तसेच, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येत आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना (Annapurna Yojana) – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही देखील महिलांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ घेता येईल. या योजनेची घोषणा देखील अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी केली आहे.
लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) – लखपती दीदी योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र महिलांना 1 ते 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देते. जेणेकरून त्या स्वयंरोजगार सुरू करू शकतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा देशातील महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.