प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी सुरू आहे. तसेच, अयोध्येत दिवाळी सणासारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्री राम यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भगवान श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

बुधवारी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बोलतानाच, “भगवान श्री राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. १४ वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाणार? बरोबर आहे की नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. सध्या या वक्तव्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

मुख्य म्हणजे, बुधवारी जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्यानंतर ठाण्यामध्ये काही आंदोलकांनी येऊन त्यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. परंतु या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. सध्या या आंदोलनानंतर आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनाची जोरदार तयारी सुरू असताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.