Satara News : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारची जोरदार धडक; एक ठार, नऊ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय 70) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमी झालेल्यांमध्ये एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने एसटी (एमएच- 14 बीटी- 1267) निघाली होती. याचवेळेस फलटणहून सांगोलाच्या दिशेने एक कार (एमएच- 12 डीवाय- 1502) निघाली होती. पिंपरद हद्दीतील बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत एक ठार, तर नऊ जण जखमी झाले. पिंपरदजवळ हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास झाला.

चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपल्ले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले तर कमल भीमराव यलपल्ले (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर एसटी बसमधील स्वाती बंडू खोमणे (17, रा. निंबळक ), दयानंद सीताराम गावडे (19, रा. गुणवरे), श्रद्धा सूर्यकांत दळवी (17), आकांशा बापू चव्हाण (17, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (17, रा. निंबळक ) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी हे जखमी झाले.

या अपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एसटी बसचालक शरद वडगावे व कारचालक मोहन भीमराव यलपल्ले यांनी एकमेकांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.