हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्वारगेट बस स्थानकात (Swarget Bus Stand) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला अटक करण्यात आली असली तरी ही घटना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्य परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गणवेश सक्तीचा आदेश
स्वारगेटवर घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळाने चालक-वाहकांसाठी गणवेश सक्तीचा आदेश जारी केला आहे. महामंडळाच्या मुख्यालयातून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, चालक व वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित गणवेशच परिधान करावा लागणार आहे. सद्यस्थितीत अनेक कर्मचारी वेगवेगळ्या पोशाखात ड्युटीवर हजर राहत असल्याने महामंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
गणवेश न घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
एसटीच्या वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, मार्ग तपासणी पथक, सुरक्षा आणि दक्षता शाखा यांच्यामार्फत नियमित तपासणी केली जाईल. गणवेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. यामुळे भविष्यात महामंडळाची शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कामगार संघटनांची नाराजी
एसटी प्रशासनाने अचानक लागू केलेल्या या आदेशावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, गणवेश सक्तीचा आदेश देण्यात आला असला तरी चालक-वाहकांना अद्याप गणवेशाच्या शिलाईसाठी मदत करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय जाचक असल्याचे मत काही संघटनांनी मांडले आहे.
खाकी टी-शर्टलाही बंदी
महत्वाचे म्हणजे, चालक आणि वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत गणवेशाशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्यायी पोशाख स्वीकारला जाणार नाही. दरम्यान, स्वारगेट प्रकरणानंतर महामंडळाच्या सुरक्षेविषयी प्रवाशांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाकडून गणवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.