सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (12 ऑगस्ट) श्रावणी सोमवार असून या शुभदिनी देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारमधील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिराबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली (stampede at Siddheshwarnath temple) असून या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. श्रावणी सोमवार निमित्त देवाला पाणी अर्पण करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. त्याच दरम्यान भल्या पहाटे हि दुर्घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी होती की भाविकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. काही वेळातच चेंगराचेंगरी झाली आणि लोक एकमेकांवर तुटून पडले. या अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जेहानाबाद सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पर्वताच्या शिखरावर एक मंदिर आहे आणि लोक त्यावर चढून येथे जल अर्पण करतात, त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. आणि जखमींना मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. एसडीओ विकास कुमार यांनी सांगितले की, ते लवकरच या घटनेबाबत अधिकृत निवेदन देणार आहेत. सुरक्षेत त्रुटी होती का असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले, रविवारी रात्री गर्दी जास्त असते, तीन सोमवारनंतर हा चौथा सोमवार होता. आम्ही सावध होतो. दिवाणी, दंडाधिकारी आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. हा अपघात कसा घडला, तपासानंतरच अधिकृत माहिती दिली जाईल