स्टार्टअप स्पर्धेमुळे सामान्य तरुणांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ : रुचेश जयवंशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | स्टार्टअप स्पर्धेमुळे सामान्य तरुणांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ मिळवून दिल्याने त्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा करुन घ्यावा व प्रभावीपणे आपल्या नव्या संकल्पनांचे सादरीकरण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नानिन्यता विभागामार्फत कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालय सातारा येथे जिल्हास्तरीय स्टार्टअप यात्रेचे सादरीकरण स्पर्धा पार पडली. त्यावेळी श्री. जयवंशी बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नोंदणीकृत स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धेमध्ये देखील सातारा जिल्ह्यातीलच जास्तीत जास्त उमेदवार निवडले जातील अशी अशा व्यक्त केली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. या स्टार्ट अप स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून 39 उमेदवारांनी प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ परीक्षकांनी प्रत्येक उमेदवारांच्या नव संकल्पनांचे परीक्षण करुन अतिम गुण निश्चित केले.

या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक सिध्दी दिपक सावंत, द्वितीय क्रमांक अमन पठाण व तृतीय क्रमांक जास्मीन शेख यांना अनुक्रमे रु. 25 हजार, रु. 15 हजार व रु. 10 हजार चे पारितोषीक घोषित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्टार्टअप स्पर्धेमध्ये मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.