मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सूत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा आयोगातील एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या चार दिवसात हा दुसरा राजीनामा देण्यात आला आहे. आज मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या मागासवर्ग आयोगात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी बबनराव तायवाडे, संजय सोनवणे, बी. एल. किल्लारीकर यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीत माझ्यासोबत झालेल्या भेदभावांमुळे व्यथित होऊन मी पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. एकीकडे आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय होत असताना दुसरीकडे सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सर्व समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी बी. एल. किल्लारीकर यांनी केली होती. परंतु याबाबत एकवाक्यता न झाल्याने दोन दिवसांमध्ये किल्लारीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोगात चांगलेच खळबळ उडाली आहे.