Tuesday, January 31, 2023

विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून प्रत्येकी ५ लाखांची मदत : मंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिकची ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घटना ताजी असतानाच विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देईल अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

विरार रुग्णालयात लागलेल्या आधीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,’ हा एक मोठा अपघात आहे. याला जबाबदार असणाऱ्याची गय केली जाणार नाही. प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देईल ‘ अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. या घटनेतील मृतांना आदरांजली वाहिली आहे. तसेच केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या घटनेतील जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देखील जाहीर करण्यात आले आहेत.

भंडारा घटनेतून धडा घेतला नाहीच का ?

वसईतील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते असेही बोलत जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून पुढील कारवाई सुरू आहे. यापूर्वी भंडारा येथे झालेल्या मागील दुर्घटनेचा धडा अद्यापही काही रुग्णालयाने घेतला नाही का?असा सवाल मात्र आता उपस्थित होऊ लागला आहे.