औरंगाबाद : नाशिक येथील ७१ वर्षीय व्यक्तीच्या शरीराला धातूचे नाणे आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला. कोरोनाची लस घेतल्यानंतरच असा प्रकार झाल्याचा दावा सदर व्यक्तीकडून करण्यात आला. त्यानंतर आता औरंगाबादेतही अशीच घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते विष्णू वखरे यांच्याही शरीराकडे धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षित होत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगतात. लसीमुळे नव्हे तर अंगावरील घाम, तेलकटपणा यामुळे असे होत असावे असे वखरे यांचे म्हणणे आहे.
कोरोनाची लस घेतल्यावर नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याची अफवा पसरली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लसीमुळे शरीरात चुंबकत्व निर्माण होते, अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकतात अशी चर्चा, कुजबूज सुरु झाली. नाशिकच्या सिडको भागात राहणाऱ्या अरविंद सोनार नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीने कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर त्यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटवू लागल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या वस्तू संबंधित व्यक्तीच्या शरीराला का चिटकत आहेत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.
संबंधित व्यक्तीच्या घरी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाची झुंबड उडाली. त्यांच्या अंगाला लोखंडी चमचे, प्लेट चिटकत असण्याचे फोटो आणि व्हिडिओ आणखी प्रसारित होऊ लागले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि आरोग्य विभागाच्या पथकाने धाव घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लसीमुळे असे होते हा गैरसमज न ठेवता यामागचे वैज्ञानिक कारण काय हे शोधले पाहिजे, असे म्हंटले आहे. तर या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून केली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
घाम आणि तेलकटपणामुळे असे घडत असावे
कोरोनाची लस घेतल्यानंतर स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकतात अशी चर्चा रंगली. या प्रकारानंतर कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू वखरे यांनीही हा प्रयोग करून बघितला. त्यांच्या शरीराकडे धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षित होत असल्याचे दिसले. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नव्हता. हा प्रकार त्यांना स्वतःलाही गोंधळून टाकणारा ठरला. असे असले तरी लस घेणे काळाची गरज असून सर्वांनी लस जरूर घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विष्णू वखरे यांनी केले आहे. असे प्रकार अंगाला घाम किंवा क्वचित तेलकटपणा असेल तरी शरीराला वस्तू चिकटू शकतात. वस्तू अधिक वजनदार असतील तर त्याची वैज्ञानिक कारणे असू शकतात. मात्र कोरोना लसीमुळे असे घडतेे हे म्हणणे चुकीचे असल्याचे विष्णू वखरे यांनी सांगितले.