बंधाऱ्यावरील चोरलेल्या 9 लाख 30 हजारांच्या प्लेटा जप्त : एकाला अटक, एक फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
जाधववस्ती (ता. दहिवडी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरल्यानंतर सातारा येथे विक्रीसाठी आणलेल्या असताना पाठलाग करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तर एकजण संशयित आरोपी पळून गेला आहे. अक्षय पोपट धस (वय- 26, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यास स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी जेरबंद केले. नितीन ऊर्फ अप्पा अशोक साळुंखे (वय- 33, रा. भादे, ता. खंडाळा) हा पळून गेला आहे. दोन्ही संशयित मोक्कातील गुन्हेगार आहेत. सातारा पोलिसांनी संशयितांकडून एकूण 9 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना काही जण कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बंधाऱ्यालगत काढून ठेवलेल्या चोरीच्या लोखंडी प्लेटापैकी काही प्लेटा गाडीतून (क्र. MH-11-DD-1187) विक्री करण्याकरिता बॉम्बे रेस्टॉरंट चौक साताऱ्याजवळ थांबला आहे. त्यांनी या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांना दिल्या. तासगावकर यांनी तपास पथकासह जाऊन शोध घेतला असता ही गाडी बॉम्बे रेस्टॉरंट चौक साताऱ्याकडे येताना दिसली. गाडी थांबविण्याचा इशारा केला असता संशयिताने गाडी भरधाव वेगात घेतली. पाठलाग करून गाडी थांबविली असता, त्यातील एक जण पळून गेला. गाडीच्या चालकास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्याने प्लेटा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण 9 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांना सापडलेला व पळून गेलेला दोन्ही संशयित नुकतेच मोक्कामधून जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, पोलिस नाईक तानाजी माने, अजित कर्णे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील दौंड, तसेच पोलिस हवालदार दीपाली यादव यांनी ही कारवाई केली.