कृष्णा कारखान्याला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुरेश भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
काटकसरीचा कारभार, ऊर्जेची बचत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रसामुग्रीमध्ये आवश्यक ते बदल आणि उपलब्ध क्षमतेच्या पूर्ण वापरातून कृष्णा कारखाना सक्षमपणे वाटचाल करत आहे. सभासदांच्या सहकार्याने कृष्णा कारखाना सहकार क्षेत्रात आणि साखर उद्योगात यशोशिखरावर नेण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

या सभेला सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयाराम पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जयवंत मोरे, विलास भंडारे, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदींसह मान्यवर व सभासद शेतकरी उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णा कारखान्याला अधिकाधिक ऊस घालण्याकडे लोकांचा ओढा आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे या हंगामात मार्चपर्यंतच सर्व ऊसाचे गाळप करण्यात आपला कारखाना यशस्वी होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. येत्या काळात ऊसाला आणि साखरेला चांगले भवितव्य राहणार असले, तरी ऊसक्षेत्र मात्र मर्यादितच राहणार आहे. त्यामुळे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे घेता येईल, याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात जुनी झालेली यंत्रसामग्री आमच्या संचालक मंडळाने बदलत आणली असून, त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच कार्यक्षमताही वाढली आहे. ज्याचा परिणाम म्हणून आपल्या कारखान्याला गेल्यावर्षी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. भविष्यातील इथेनॉलची वाढती मागणी लक्षात घेऊन, आपण डिस्टीरीच्या क्षमतेत वाढ केली आहे. सभासदांबरोबरच कामगार हादेखील कृष्णेचा घटक असल्याने, कामगारांना लवकरच योग्य लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, की राज्याला आदर्श वाटतील असे महत्वपूर्ण निर्णय डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने गेल्या ७ वर्षात घेतले आहेत. कृष्णा कारखान्यावर लोकांचा मोठा विश्वास असून, या विश्वासाला पात्र राहून हे संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखान्याच्या विस्तारीकणामुळे येत्या गळीत हंगामात कृष्णा कारखाना प्रतिदिन १०००० मे. टन क्षमतेपेक्षा जास्त गाळप करणार असल्याने कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. यंदा जवळपास १६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या चांगल्या कामगिरीची दखल घेत, परदेशातील एका कंपनीने कारखान्याच्या सहकार्यातून बायो सीएनजी प्रकल्पाच्या उभारणीसाठी ६० कोटींची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या नफ्यातील वाटा कारखान्यास प्राप्त होणार आहे.

यावेळी विषयपत्रिकेतील विविध विषयांचे वाचन करून ते एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे चेअरमन डॉ. भोसले यांनी दिली. दरम्यान यावेळी कृष्णा कृषी विकास परिषदेच्या नूतन सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी नोटीशीचे वाचन केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

डॉ. सुरेश भोसले यांचा विशेष सत्कार

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वामुळे गेली सलग २ वर्षे कारखान्याला व्ही.एस.आय.चे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे पुरस्कार प्राप्त झाले. तसेच डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारासाठी दिलेल्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर घेत, पॅरिस येथे नुकताच डॉ. भोसले यांचा सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल सर्व सभासदांच्यावतीने माजी आमदार भगवानराव साळुंखे, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व संचालक मंडळाच्या हस्ते डॉ. भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुढील वर्षापासून सभासद कल्याण निधी

कृष्णा कारखान्याच्या सभासदाच्या कुटुंबावर अचानक आपत्ती कोसळून नुकसान झाल्यास अथवा अचानक आजारपण उद्भवल्यास त्याला उचित आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी दरवर्षी एफ.आर.पी. व्यतिरिक्त काही रक्कम सभासद कल्याण निधी म्हणून बाजूला काढण्यात यावी, अशी मागणी जगदीश जगताप यांनी सभेदरम्यान केली. या सूचनेची दखल घेत पुढील वर्षांपासून सभासद कल्याण निधीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे सुतोवाच चेअरमन डॉ. भोसले यांनी केले असता, सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्याला सहमती दर्शविली.