परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्हातील पांगरा येथील शासकीय निवासी शाळेमध्ये गुरुवारी रात्री ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असुन २६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पूर्णा तालूक्यातील पांगरा येथे राज्यशासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय शासकीय निवासी शाळा आहे. याठिकाणी १७५ विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. गुरुवारी तेथे उपस्थित असलेल्या १३४ विद्यार्थ्यांपैकी जेवणानंतर ३५ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ ,डोके दुखणे असा त्रास होवू लागला.
बाधित विद्यार्थ्यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.यावेळी डॉ.नागेश देशमुख,डॉ.जाधव यांनी तातडीने उपचार केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनीही तेथे धाव घेतली. २६ विद्यार्थ्यांची तब्यत गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. मिळालेल्या माहिती नुसार सध्या विषबाधीत विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून धोका टळला आहे .
पांगरा येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे काम पुसद येथील एका कंपनीस देण्यात आलेले आहे.विद्यार्थ्यांना निकृष्ट व दर्जाहीन भोजन दिल्या जात असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून दिल्या जात होत्या, मात्र उघड व लेखी स्वरूपात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही,तसा दबाव विद्यार्थ्यांवर टाकल्या जातो अशीही चर्चा आहे. दरम्यान या निवासी शाळेला व वसतीगृहाला समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी पथकासह भेट देवून पहाणी केली.