हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीच्या तुलनेत नगदी पिकांवर लक्ष केंद्रित करणे हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाबुळगाव येथील सुधीर चव्हाण यांचा अनुभव मोठा ठरला आहे. पारंपारिक पिकांची लागवड सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळलेल्या सुधीर चव्हाण यांनी केवळ दीड एकरामध्ये रताळ्याचे उत्पादन घेत लाखोंचा नफा कमावला आहे.
रताळ्याची लागवड –
सुधीर चव्हाण यांनी सांगितले की, रताळ्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम मातीची योग्य तयारी करणे आवश्यक आहे. नांगरणी करून रोटावेटरने माती दोन-तीन वेळा नांगरल्यानंतर रताळ्याची रोपे लावली जातात. लागवडीपासून 120 ते 130 दिवसांत कंद तयार होतात. पिवळी पडलेली पाने ही रताळे काढण्याची निशाणी असते. चांगल्या जातीची पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते.
कमी खर्चात चांगले उत्पन्न –
‘वर्षा’, ‘श्री नंदिनी’, ‘श्रीरत्न’, ‘श्री वर्धिनी’, ‘राजेंद्र रताळे 5’, ‘पुसा पांढरा’ आणि ‘पुसा सूनहरी’ यांसारख्या सुधारित जातींमुळे त्यांना चांगला फायदा झाला आहे. या पिकाची लागवड जास्त पाणी किंवा खताची आवश्यकता न करता चांगली होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळते.
लाखोंचा नफा –
रताळ्याची लागवड भारतात उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते. तज्ञांच्या मते, रताळे हे बारमाही पीक असले तरी उन्हाळा आणि पावसाळा हंगामात त्याचे उत्पादन जास्त चांगले होऊ शकते. हिवाळ्यात बाजारात रताळ्याची मागणी जास्त असते, त्यामुळे या पिकाला चांगला भाव मिळतो. चव्हाण यांनी सांगितले की, 1.5 एकरात 600 पोती रताळ्याचे उत्पादन घेऊन तीन लाख रुपयांचा नफा मिळवला. रताळ्याची लागवड करण्याचा खर्च प्रति एकर 5000 रुपये असून त्यावर लाखोंचा नफा मिळवणे हे शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरले आहे.