हिमाचलमध्ये काँग्रेसराज!! सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यांनंतर आज सत्तास्थापन केली आहे. काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी सर्व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, प्रियांका वाड्रा, मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांनी म्हंटल की, आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. आम्ही 10 हमीपत्रे दिली असून त्यांची अंमलबजावणी करू. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणती हमी योजना आधी करायची याचा निर्णय घेऊ.

दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धक्का देत सत्ता काबीज केली. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी तब्बल ४० जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय ३ अपक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. हिमाचल मध्ये कोणतेही सरकार सलग दोनवेळा निवडून आलेलं नाही, हि परंपरा यंदाही कायम राहिली आहे.