हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरु असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हाळयात मुलांच्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जावं आणि उन्हापासून सुटका करावी असं प्रत्येकालाच वाटत असत. तुम्ही सुद्धा हाच विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशी 5 ठिकाणे (Summer Tourist Places In India) सांगणार आहोत ज्याठिकाणी जाऊन आपल्या सुट्ट्या अगदी आंनदात साजऱ्या करू शकता.
1) मनाली – (Manali)
मनाली हे ठिकाण हिमाचल प्रदेश येथील असून ते त्याच्या अतुलनीय सौंदर्यामुळे आणि नैसर्गिक आकर्षणांसाठी ओळखले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात फिरण्यासाठी मनाली हे सर्वात सुंदर आणि लोकप्रिय असं ठिकाण आहे. पॅराग्लायडिंग, झॉर्बिंग, क्वाड बाइकिंग असे अनेक साहसी खेळ करून तुम्ही या ठिकाणचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनालीचे नाव घेतलं जात. याठिकाणी तुम्हाला हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक मनालीला जाऊन आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतात.
2) शिमला- (Shimla)
शिमला हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे सुद्धा हिमाचल प्रदेशमध्येच असून दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. समृद्ध असा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याने शिमला नटलेले आहे . येथून हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते. शिमल्यात तुम्हाला द शिमला स्टेट म्यूज़ियम, मॉल रोड, क्रिस्ट चर्च, हिमालयन बर्ड पार्क, किआला फॉरेस्ट, समर हिल्स अशी अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही एप्रिल- मे महिन्यात सुट्ट्या कुठे घालवाव्या या विचारात असाल तर शिमला तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट ठिकाण ठरेल.
3) माउंट अबू- (Mount Abu)
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. माउंट अबू हे जमिनीपासून सुमारे 1220 मीटर उंचीवर असून राजस्थानचे पर्यटन स्थळ. हे सर्वात जास्त थंड आणि सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक उन्हाळ्यात याठिकाणी भेट देतात. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या हिल स्टेशनमध्ये अनेक हिरवीगार जंगले, धबधबे आणि तलाव आहेत, तसेच माउंट अबू अनेक धार्मिक स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे . याठिकाणी अचलगढ़ किल्ला, अर्बुदा देवी मंदिर, टॉड रॉक, हनीमून पॉइंट, ब्रह्माकुमारी पिस पार्क अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.
4) दार्जिलिंग- Darjeeling
चहाच्या बागेचे नंदनवन असलेले दार्जिलिंग उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वात बेस्ट पर्यटन स्थळ आहे. पश्चिम बंगालमधील अत्यंत शांत आणि सुंदर असं हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. विशेषत: हनिमून जोडप्यांना इथलं निसर्गरम्य वातावरण संमोहित करणारे आहे. एक सुंदर हिल स्टेशन असल्याने दार्जिलिंग हे क्वीन ऑफ हिल्स म्हणूनही ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठ्या उंचावरील प्राणीसंग्रहालय, पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान, सिमाना व्यू पॉइंट, ऑरेंज व्हॅली टी इस्टेट, जोरपोखरी तलाव अशी अनेक मनमोहीत करणारी पर्यटन स्थळे दार्जिलिंग मध्ये आहेत.
5) लोणावळा- Lonavala
मुंबईपासून फक्त एक तासाच्या अंतरावर असलेलं लोणावळा हे उन्हाळ्यात पर्यटनासाठी बेस्ट ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेच्या ठिकाणांमध्ये लोणावळ्याचे नाव अग्रक्रमाने घेतलं पाहिजे . लोणावळ्यात तुम्हाला धबधबे, तलाव आणि डोंगररांगा पाहायला मिळतील तसेच ट्रेकिंग आणि इतर साहसी खेळांसाठी सुद्धा हे लोकप्रिय ठिकाण मानले जाते. लोणावळ्यात तुम्हाला टायगर पॉइंट, भुशी डॅम, आंबी व्हॅली, लोहगड किल्ला , पवना सरोवर, भीमाशंकर ट्रेक, वेट एन जॉय वाटर पार्क अशा ठिकाणांना भेट देऊन आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू शकता.