Satara News : कराड बाजार समितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या संरक्षक भितींबाबतच्या आदेशाला दिली स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशाची माहिती मिळताच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक व व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कर्मचारी, व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीची संरक्षक भिंत पाडून रस्ता देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्यावतीने सुरुवातीला तीन फूट भिंत पाडण्यात आली होती. त्यानंतर कराड शहरातील त्रिशंकू भागातील नागरिकांनी तीन फूट ऐवजी 40 फूट भिंत पाडण्यासाठी कराड पालिकेत आंदोलन सुरू केले. तर दुसरीकडे संरक्षण भिंत पाडण्याचा उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशा विरोधात बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने 20 फूट भिंत हटविण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1069833544016896

संरक्षक भिंत पाडण्यावरून बाजार समिती आणि नगरपालिका प्रशासन आमनेसामने आले होते. पालिका प्रशासन पोलिस बंदोबस्तात संरक्षक भिंत पाडण्यासाठी बाजार समितीत गेले असता बाजार समिती संचालक, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर या ठिकाणी पोलिसानी मध्यस्थी करत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत तसेच निकाल हाती येईपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले होते. बाजार समितीने उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगितीचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.