व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला!! जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजूरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला आहे. कारण की, इथून पुढे उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रातील विविध धरणातून सोडले जाईल. त्यामुळे आता मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे. मुख्य म्हणजे, जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान घेण्यात आला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला अहमदनगरने विरोध केल्यामुळे या प्रकरणाचा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला होता. हायकोर्टात अहमदनगरकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी देखील कोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होईल, असे सांगितले.

त्यामुळे आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून देखील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर, मुळा प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. तसेच प्रवरा प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून 0.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील नागरिकांचे पाण्यासाठी वणवण भटकणे बंद होणार आहे.