Wednesday, June 7, 2023

सीमावादाचा मुद्दा लोकसभेत गाजला; सुप्रिया सुळे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्यं करत आहेत, महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत लक्ष्य घालावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील लोकांना मारहाण केली जात आहे, हे चालणार नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे त्यामुळे अमित शहांनी याप्रकरणी लक्ष्य घालावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे आक्रमक होताच महाविकास आघाडीचे इतर खासदारांनीही त्यांना पाठिंबा दिला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही सुप्रिया सुळेंची बाजू उचलून धरली. कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, असं म्हणत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली