दादा तू मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना गृहमंत्री करू नको.., सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. यासगळ्यात राज्यातील अनेक मुद्यांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भाजप सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधत एक मोठे विधान केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित दादांना (Ajit Pawar) विनंती करत म्हटले आहे की, “दादाला विनंती असेल की तू जेव्हा मुख्यमंत्री होशील, तेव्हा फडणवीसांना गृहमंत्री करू नका, जनता सुरक्षित राहण्यासाठी इतर कोणालाही गृहमंत्री करा, पण त्यांना नको” अशी उपरोधिक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री करू नको..

अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 2024 मध्ये अजित दादांना मुख्यमंत्री बनविणार असतील तर मी अतिशय मनापासून स्वागत करते. फडणवीस खूप मोठ्या मनाचे असून त्याग काय आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. भाऊ कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसासारखा असावा, त्यामुळे अजित दादा जेव्हा मुख्यमंत्री होतील, तेव्हा त्यांना सांगेन की यांना गृहमंत्री करू नको, कुणाला पण गृहमंत्रालय द्या, पण त्यांना देऊ नको..

त्याचबरोबर, “देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा दहा पैकी दहा मार्क होते त्यांचं डिमोशन झालं. दहापैकी पाच मार्क दिले गेले. त्याच्यात आता पुन्हा डीमोशन झालं. मुख्यमंत्र्यांवरून थेट उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यामुळे थेट अडीच मार्कवर आलं आणि त्यातही साडेतीन मार्क पासिंगसाठी लागत असतात, त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल देखील आता वाईट वाटत आहे. ज्यांनी 105 आमदार निवडून आणले त्यांना उपमुख्यमंत्री करून ठेवलं” अशी उपरोधिक टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

…ही घटना अतिशय संतापजनक

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याविषयी देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हटले आहे की, “ही घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.‌ हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे”