सुरेश धस मुंडेंना वाचवतायंत? जरांगे पाटलांनी व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापवले आहे. सुरेश धस यांनी व्यक्त केलेली भूमिका मोठ्या वादाच्या कचाट्यात सापडली आहे. एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन हे प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच गाजू लागले असून, मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे. जरांगे यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, देशमुख कुटुंबांवर दबाव आणला जातो आहे का? सुरेश धस यांच्या विधानामुळे मराठा समाजात नाराजीची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे सरकारवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे. हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे होत आहे.

मुलाखतीत सुरेश धस म्हणाले तरी काय? –

एका मुलाखतीत सुरेश धस म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात फार आगंतूकपणे सहआरोपी वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे केस कमजोर होऊ शकते. ज्यांचं रोल डिफाईन झालेलं नाही, त्यांना सहआरोपी केलं, तर मुख्य आरोपीलाही जामिन मिळू शकतो. त्यामुळेच आम्ही, देशमुख कुटुंबिय आणि कायदेतज्ज्ञांनी याबाबतीत ब्रेक लावला आहे, हे मान्य करतो. त्यांच्या या विधानावरून आता आरोप होत आहेत की, धस कुणालातरी वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मनोज जरांगे काय म्हणाले –

या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे म्हणाले, “धस काय बोलले, त्याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्राला लागतोय. सहआरोपी करणार नाही, हे जर त्यांनी मान्य केलं असेल, तर यामागे काहीतरी वेगळाच गेम सुरू आहे. फडणवीस आणि धस यांनी देशमुख कुटुंबियांवर दबाव टाकला आहे का? हा प्रश्न निर्माण होतोय.” त्यांनी पुढे म्हटलं की, “नियतीला अशा गुप्त भेटी मान्य नाहीत. संतोष देशमुख यांचा तळतळाट या लोकांना लागणार आहे.”

धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत –

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सहआरोपी करण्याची मागणी देखील जोर धरत आहे. मनोज जरांगे अन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत, “मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय कार्यकर्ता असून त्याला फरार होण्यासाठी मदत झाली,” असं म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण अधिकच गंभीर वळणावर असल्याचे दिसून येत आहे.