शिराळा तालुक्यात 6 गव्याचा संशयास्पद मृत्यू : विषबाधेचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिराळा प्रतिनिधी। आनंदा सुतार
रिळे (ता. शिराळा) येथे दोन नर व तीन माद्या अशा पाच गव्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असुन सदरचा विष बाधेने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे. तर शांतीनगर येथील वनविभाग हद्दीत वृद्धापकाळाने मृत्यू झालेला गवा दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळला. त्यामुळे मृत गव्यांची संख्या सहा झाली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळ व वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी पाच वाजता रिळे येथील पाटील दरा परिसरात गेलेल्या लोकांना उग्र वास येत होता लोकांनी परीसरात शोधले असता झाडीत गवा सडलेल्या अवस्थेत आढळला. वन विभागास कळवण्यात आले असता,शिराळाचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, सुरेश चरापले, वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत एक गवा सापडला. आजु बाजुला पाहिले असता काही अंतरावर दुसरा गवा सडलेल्या अवस्थेत आढळला. आज सकाळी पुन्हा परिसराची पाहणी केली असता तिसरा गवा मृतावस्थेत आढळला. एका गव्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अंबादास माडकर व डॉ. शुभांगी अरगडे यांनी केले. गव्याचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. सायंकाळी चार नंतर आणखी मादी जातीचे दोन गवे मृत आढळल्याने रिळे येथे मृत गव्यांची संख्या पाच झाली.

तीन गव्यांचे दहन दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास केले व दोन गव्यांचे एका ठिकाणी जेसीबीने मोठा खड्डा काढून त्यात दहन करण्यात आले. तर दुसऱ्या ठिकाणी एका गव्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी चार नंतर आणखी मादी जातीचे दोन गवे मृतावस्थेत आढळले. त्यांचे रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक असे पन्नासवर लोक यासाठी काम करत आहेत. उपवनसंरक्षक निता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, फिरते पथक वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. रिळेचे उपसरपंच बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार, शेतकरी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास वनक्षेत्रपाल सचिन जाधव करीत आहेत.

गव्यांचे दोन कळप परिसरात
दोन कळपात १२ ते १५ गवे फिरताना लोकांना दिसत आहेत. अचानक पाच गवे मृतावस्थेत आढळल्याने तसेच विष बाधेची शक्यता असल्याने मृत गव्यांची संख्या वाढते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

‘तो’ गवा वृद्धत्वाने मृत
बिऊर शांतीनगर येथील बिऊर तलावाच्या ओघळीत वन विभागाच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी नर जातीचा गवा मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाला आहे.