स्वाभिमानीने कृष्णा व राजाराम बापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला होता. त्यानंतर सकाळी कराड तालुक्यातील वाठार येथे कृष्णा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी घटनास्थळी कराड तालुका पोलिस यांनी धाव घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 17 व 18 नोव्हेंबर रोजी ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटविण्यात आला. तर सकाळी वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे व शेतकरी यांनी ऊस वाहतूक रोखून धरली. कराड तालुका पोलिसांनी वाठार येथील चौकात चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आंदोलकांनी हिंसक आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे. यावेळी पीएसआय दिपज्योती पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

शासनाकडून पोलिस बळाचा वापर सुरू : देवानंद पाटील
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कराड तालुक्यात आम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही कृष्णा व राजाराम बापू साखर कारखान्याची वाहने पुन्हा मागे पाठवली आहेत. परंतु शासन पोलिस बळाचा वापर करत आहे. आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही आम्ही आक्रमकपणे यापुढील काळात न्याय न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिला आहे.

ऊसतोड बंद आंदोलनाला प्रतिसाद द्या : राजू शेट्टी
साखरेची किमान विक्री किंमत 31 रुपयांवरुन 35 रुपये करणे आवश्यक आहे. तसेच इथेनॉल निर्मितीचा खर्च वजा करुन राहणाऱ्या र‍कमेतील 70 टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांना द्यावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी. तसेच खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी, आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो असे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे.