Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास!! ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने नवा इतिहास रचला आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. मराठमोळ्या खेळाडूनें आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकावला आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवून देणारा स्वप्नील महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला पदक मिळवून दिले होते. त्यानंतर आता तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या खेळाडूने देशाला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे.

50 मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत स्वप्नीलने (Swapnil Kusale) एकुण 451.4 गुण प्राप्त केले. या खेळात चीनच्या लिऊ युकुनने 463.6 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकलं तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. स्वप्नीलपूर्वी मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी भारताला पदक मिळवून दिले होते. स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत एकूण 590 गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघे 198, प्रोनमध्ये 197 आणि उभे राहून 195 गुण मिळवले. आता त्याने कांस्यपदक मिळवत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोण आहे स्वप्निल कुसाळे? Swapnil Kusale

स्वप्निल कुसाळे हा कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील खेळाडू आहे. 6 ऑगस्ट 1995 रोजी त्याचा जन्म झाला . 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. तुम्हाला माहिती नसेल तर स्वप्नील हा 2015 पासून मध्य रेल्वेत काम करतो. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी हा तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील सुद्धा रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. दोघांमध्ये हा खास योगायोग आहे.