हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरातील (Pune City) स्वारगेट एसटी आगारात (Swarget ST Stand) एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, दत्तात्रय याचे बड्या नेत्यांसोबत आणि पोलिसांसोबत संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
बसस्थानकात आरोपीचा मुक्त संचार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे हा स्वारगेट बसस्थानकात वारंवार दिसत असे. तो सतत पीएमपी बस स्थानक आणि एसटी आगारात वावरत होता. नागरिकांना आपण पोलीस असल्याचे भासवून अनेक तरुणींना तो फसवण्याचा प्रयत्न करायचा. याआधीही त्याने अशा प्रकारे काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच्यावर साखळी चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी तो तुरुंगातही जाऊन आला आहे.
शिवशाही बसमध्ये अमानुष अत्याचार
मंगळवारी पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्थानकात आली होती. याचवेळी आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढले. आपण पोलिस असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या तरुणीवर वैद्यकीय तपासणीत दोन वेळा बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडे याचा संपर्क काही राजकीय नेत्यांसोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तो बस स्थानक परिसरात निर्धास्तपणे फिरत होता. त्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चांगल्या ओळखी असल्यामुळे त्याच्यावर कुठलाही संशय घेतला गेला नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्या संपर्कातील राजकीय व्यक्ती आणि पोलिसांचीही चौकशी सुरू केली आहे.
तसेच, आरोपी फरार झाल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी आठ पथकांची स्थापना केली आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. तो पुणे शहरालगतच्या शेतांमध्ये लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. दुसऱ्या बाजूला, पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.