मलकापूरात राहणाऱ्या स्वातीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिराळा | बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून स्वाती प्रकाश शेवाळे (वय- 26, मूळ गाव- बेलदारवाडी, सध्या रा. मलकापूर- कराड) यांचा संशयित आरोपी पती प्रकाश आनंदा शेवाळे याने गळा दाबून खून केला. सदर घटना दि. 10 रात्री 10 ते दि 11 च्या सकाळी 11 वाजण्याच्या दरम्या राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून खून करण्यात आला. संशयित आरोपी प्रकाश शेवाळे हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.

याबाबतची फिर्याद मयत स्वाती हिची आई वत्सला हणमंत चव्हाण (वय- 48, रा.मलकापूर कराड, मुळगाव- गुंजेवाडी, जि. उस्मानाबाद) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. मयत स्वाती व प्रकाश शेवाळे यांना मुलगा अथर्व (वय- 4) व मुलगी आराध्या (वय- 2) अशी दोन लहान मुले आहेत. आई वडीलांच्या भांडणात दोन चिमुकली भावंडे पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी प्रकाश शेवाळे हा पत्नी स्वाती सह मुलांना घेऊन कराड येथे मोलमजुरी करून भाड्याने रहात होता. प्रकाश आपली पत्नी स्वाती हिच्यावर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता. तर गुरुवार दि. 10 रोजी प्रकाश याची आई रंजना या वडील आनंदा यांना घेऊन कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. तिथे प्रकाश व पत्नी स्वाती हे दोघे ही गेले. तेथून प्रकाश पत्नी सह बेलदारवाडी येथे गावी सायंकाळी आला. सर्वांनी एकत्र जेवण केले. आनंदा हे आजारी असल्याने रंजना या त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या व सकाळी लवकर उठून जनावरांना वैरण व शेण घान करण्यासाठी शेतात गेल्या. सकाळी नऊ वाजता घरी परत आल्या तर मुलगा व सून यांच्या खोलीचं दार बंद दिसलं. यावेळी त्यांनी आवाज दिला तर प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून दरवाजा उघडला तर सून स्वाती ही निपचीत पडलेली दिसली. तर मुलगाही तिथे नव्हता.

यावेळी मयत स्वाती हिच्या मृतदेहा शेजारी चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत लिहिले आहे की, मी माझी पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला असुन यात माझ्या घरच्याना किंवा स्वाती हिच्या घरच्याना कोणालाही दोषी धरु नये. राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून पती प्रकाश याने खून केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर, कालिदास गावडे, गणेश झनजरे, दीपक हांडे, विनोद जाधव, भाऊसाहेब कुंभार, सुभाष पाटील, अमर जाधव, अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी प्रकाश शेवाळे याचा शोध घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करीत आहेत.