औरंगाबादेत सलग 75 तास पोहण्याचा विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतास स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.तीन ) या उपक्रमाचा समारोप झाला. यात आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशाला सलाम करण्यासाठी सलग ७५ तास पोहण्याचा जलतरणपटूंनी विक्रम केला

महापालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावात हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी जलतरणपटूंना शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रवींद्र निकम, जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष रुस्तुम तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय अमृत सोहळ्याचा हा उत्सव व देशाला सलाम करण्यासाठी सलग ७५ तास जलतरण करण्याच्या उपक्रमाचे पहिल्या संघाचे नेतृत्व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व विष्णू लोखंडे यांनी केले. या उपक्रमात निकम, लोखंडे यांच्यासह रुस्तुम तुपे, रामेश्‍वर सोनवणे, कदीर खान, एकनाथ मगर, वसंत पवार, सुदाम औताडे, गोपीनाथ खरात, राजेश पाटील या जलतरणपटूंनी सलग ७५ तास पोहून अमृत महोत्सव सोहळा अविस्मरणीय बनविला. गुरूवार (ता.३०) पासून या उपक्रमाला सुरूवात झाली होती. या कालावधीदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडू, संघटना, पालक, क्रीडाप्रेमी यांनी या जलतरणपटूंना भेट देऊन उत्साह द्विगुणित केला.

यावेळी जलतरणपटू पौर्णिमा पाटील हिने भारतमातेच्या वेषात सर्वांचे लक्ष वेधले. विक्रमवीर जलतरणपटूंचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभय देशमुख, मुकेश बाशा, रवींद्र पवार, राजेंद्र काळे, रवींद्र राठी, सुशील बंग, सीमा देशमुख, कविता जाधव, पद्मावती धारवाडकर, निखिल पवार, अजय भोजने, अजय दाभाडेने व औरंगाबाद जिल्हा जलतरण संघटनेने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजय दाभाडे यांनी केले.

Leave a Comment